मुंबई- ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून त्यासाठी संबंधितांनी अधिक कार्यक्षमतेने काम करण्याची गरज आहे. यात हयगय करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी दिला आहे.
महावितरणच्या चार प्रादेशिक संचालकांसह सर्व १६ परिमंडलातील मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकार्यांच्या आढावा बैठकीत श्री. संजीव कुमार यांनी थकबाकी वसुलीसाठी अधिक गांभिर्याने कार्यरत व्हावे, असे निर्देश दिले. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी सातत्याने वीज वसुली मोहिमा राबवाव्यात, विशेषतः कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांच्या थकबाकी वसुलीबरोबरच चालू वीजबिल पूर्णपणे वसूल व्हावे यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच ज्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे, त्यांचे क्रॉस चेकींग करूंन जर काही ग्राहक गैरमार्गाने वीज घेत असतील तर त्याच्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिलिंग होण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी, ग्राहकांच्या मोबाईल नोंदणीचे प्रमाण वाढवावे तसेच कर्मचार्यांनी दैनंदिन कामकाजात मोबाईल अॅपचा वापर करूंन कामात गतीशिलता व पारदर्शकता आणावी, असे आदेश श्री. संजीव कुमार यांनी दिले आहेत.
महावितरणचा कारभार सुरळीत चालण्याकरिता ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक विजेच्या युनिटची वसुली होणे गरजेचे आहे. दर महिन्याला कोणत्या विभागाने किती वसुली करायची याचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येत असते. असे निदर्शनास आले आहे की, दर महिन्याची वसुली, ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा बरीच कमी होत असून याबाबतची कारणेही रास्त नसल्याने ही वसुली नेटाने व्हावी, यासाठी सर्व मुख्य अभियंत्यांना वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश श्री. संजीव कुमार यांनी यावेळी दिले.