पुणे, दि. 22 : थकबाकीदारांविरोधात सुरु केलेल्या महावितरणच्या पुणे परिमंडलातील मोहिमेत आतापर्यंत तीन लाखांवर थकबाकीदारांनी 108 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. थकीत देयकांपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई या महिन्यातही वेगाने सुरु आहे.
महावितरणकडून पुणे परिमंडलातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत देयकांच्या वाढत्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम गेल्या महिन्यापासून तीव्र करण्यात आली आहे. पुणे परिमंडलात सप्टेंबर अखेरला 6 लाख 19 हजार वीजग्राहकांकडे 190 कोटी 79 लाख रुपयांची थकबाकी होती. वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात आली. यामुळे 3 लाख 100 वीजग्राहकांनी थकीत देयकांपोटी 108 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. सद्यस्थितीत 4325 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला असून त्यांच्याकडे 7 कोटी 46 लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकीदारांकडे असलेल्या देयकांचा भरणा करण्यासाठी येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत जुन्या 500 व एक हजार रुपयांच्या नोटा महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्गात स्वीकारण्यात येणार आहे. याशिवाय महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईटवर तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदार वीजग्राहकांनी जवळच्या वीजजोडणीतून किंवा वीजचोरीतून वीज वापरल्यास भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी खंडित असलेल्या वीजजोडण्यांचीही तपासणी करण्यात येत आहे.