पुणे, दि. 05 : केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरल्यास पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या 2 लाख 34 हजार वीजग्राहकांना देयकांची थकबाकीमुक्ती शक्य झाली आहे.
दरम्यान, संपूर्ण मूळ थकबाकीचा येत्या दि. 30 नोव्हेंबरपर्यंत भरणा केल्यास 5 टक्के सूट मिळणार आहे. या योजनेच्या सहा महिन्यांच्या कालावधीत थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना कोणतेही शुल्क न भरता मागणीनुसार तात्काळ नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे.
दि. 31 मार्च 2016 पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब थकबाकीदारांसाठी महावितरणने दि. 1 नोव्हेंबरपासून थकबाकीमुक्ती योजनेला सुरवात केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील 2 लाख 34 हजार लघु व उच्चदाब वीजग्राहकांकडे 254 कोटी 18 लाख रुपयांची मूळ थकबाकी आहे. या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.
या थकबाकीमुक्तीच्या योजनेत दि. 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये 5 टक्के सूट दिली जाईल तसेच व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. दि. 1 नोव्हेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची 100 टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तर दि. 1 फेब्रुवारी 2017 ते 30 एप्रिल 2017 पर्यंत मूळ थकबाकीसोबत 25 टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार असून उर्वरित 75 टक्के व्याज व 100 टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.
या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरीत नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे. त्यासाठी सुरक्षा ठेव, सर्व्हीस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमधून सूट देण्यात येणार आहे. तथापि, सुरक्षा ठेवीची रक्कम वर्षभराच्या वीजवापरानुसार आर्थिक वर्षात आकारण्यात येणार आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर संबंधीत ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची याची माहिती उपलब्ध आहे. ही रक्कम ‘ऑनलाईन’सह धनादेशद्वारेही रक्कम भरता येणार आहे. थकबाकीदार वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.