- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याहस्ते लोकार्पण.
नागपूर : कोरोनाकाळात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देत असतानाच महावितरणकडून वैद्यकीय क्षेत्राला प्राधान्याने वीज विषयक सेवा दिली जात आहे. कामठी उपजिल्हा रुग्णालयात महानिर्मितीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टसाठी वीज पुरवठा देण्याकरिता महावितरणने अवघ्या ७ दिवसात ट्रान्सफॉर्मर उभारून नवीन वीज पुरवठा सुरु करून दिला. या ऑक्सिजन प्लॅन्टचे उदघाटन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथिल उपजिल्हा रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन प्लॅन्ट सुरु करावयाचा असून त्यासाठी वीज संबंधी सर्व उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. त्याची तत्परतेने दाखल घेत नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे, उपकार्यकारी अभियंता सुरेश राठोड, सहाय्यक अभियंता विनोद गुबे, जनमित्र अशोक राजगिरे, रोशन सपाटे आणि महावितरणच्या यादीवरील कंत्राटदार मे.महालक्ष्मी एन्टरप्रायझजचे अमित बदकी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या ७ दिवसात चबुतरा उभारून त्यावर २०० किव्हो क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर उभारले आणि नवीन लघुदाब वीज जोडणी सुरु करून दिली.
ट्रान्सफॉर्मर उभारणी करताना महावितरणने नेहमीची रीतसर प्रक्रिया न करता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वतः त्यासाठी ऑन लाईन अर्ज दि. १४ मे २०२१ ला भरून घेतला. तसेच कामाला वेगाने सुरुवात केली आणि २१ मे २०२१ला ट्रान्सफॉर्मर उभारण्याचे काम पूर्णही झाले. अशा कामासाठी इतर वेळेस साधारणतः दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो. परंतु कोरोना काळाची गरज लक्षात घेऊन सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे काम ७ दिवसातच पूर्ण केले. या साठी सुमारे ८ लाख ४० हजार ४०८ रुपये एवढा खर्च झाला असून तो जिल्हा नियोजन निधीतून करण्यात आलेला आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून महानिर्मिती मिशन ऑक्सीजन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील 35 घनमीटर प्रती तास क्षमतेच्या हा ऑक्सीजन प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते आज ३१ मे २०२१ ला या ऑक्सिजन प्लॅन्टचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कामठी चे नगराध्यक्ष शहाजहा़ँ शफात अहमद अन्सारी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते