पुणे परिमंडलातील महावितरणची धडक कारवाई
पुणे : वीजदेयके थकविणार्या पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह महावितरणच्या मुळशी, राजगुरुनगर व मंचर विभागातील 55,058 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 36,898 वीजग्राहकांनी 39 कोटी 11 लाखांचा थकीत देयकांचा भरणा केला आहे. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत थकबाकीदारांविरोधात ही धडक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, गुरुवारी (दि. 20) पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील 12460 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यातील 8162 वीजग्राहकांनी 5 कोटी 79 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
वारंवार आवाहन करून थकीत देयकांचा भरणा न केलेल्या लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांविरोधात सध्या कारवाई सुरु आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यांत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची सुरु असलेली मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरात 55,058 वीजग्राहकांचा 56 कोटी 57 लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यातील 36,898 वीजग्राहकांनी थकीत देयकांपोटी 39 कोटी 11 लाख रुपयांचा भरणा केल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर 18160 थकबाकीदारांनी 17 कोटी 46 लाख रुपयांचा भरणा न केल्याने त्यांच्याकडील वीजपुरवठा अद्यापही खंडित आहे.
महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेली मोहीम यापुढेही सातत्याने सुरुच राहणार आहे. वीजग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सणासुदीच्या दिवसांत महावितरणला कटू कारवाई करण्यास भाग पाडू नये. चालू व थकीत देयकांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईटवर तसेच मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांना वीजदेयकांबाबत काही तक्रार असल्यास महावितरणच्या संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधल्यास तक्रारींचे त्वरित निवारण करण्यात येणार आहे.
दि. 22 व 23 रोजी वीजबील भरणा केंद्रे सुरु
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 22) व रविवारी (ता. 23) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम वेगात आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.