पुणे : विश्रांतवाडी येथील चव्हाणचाळमध्ये घरगुती वीजजोडणीतून इंदस् टॉवर्स या मोबाईल टॉवरसाठी सुरु असलेली 1 लाख 41 हजार 760 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 10) तीन जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की नगररोड विभाग अंतर्गत विश्रांतवाडीमधील चव्हाणचाळ येथे श्री. जगदीश काळूराम व्यास यांच्या नावे महावितरणने घरगुती वीजजोडणी दिलेली आहे. तथापि, महावितरणच्या तपासणीत या वीजजोडणीतून इंदस् टॉवर्ससाठी औद्योगिक वीजवापर करण्यात येत असल्याचे दिसून आले. यात 13,253 युनिटची म्हणजे 1 लाख 41 हजार 760 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
या वीजचोरीप्रकरणी वीजग्राहक जगदीश व्यास, इंदस् टॉवर्सचे एरिया मॅनेजर सचिन माने, सुपरवायझर निशिकांत उगले यांच्याविरुद्ध बुधवारी (दि. 10) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.