दोन ठिकाणी ‘रिमोट कंट्रोल’चा वापर
पुणे : चाकण व महाळुंगे (ता. खेड) येथे तीन ठिकाणी वीजयंत्रणेत फेरफार करून तसेच ‘रिमोट कंट्रोल’ द्वारे सुरु असलेली वीजचोरी महावितरणने नुकतीच उघडकीस आणली आहे. यात एक लाख 274 युनिटची म्हणजे 17,42,000 रुपयांची वीजचोरी आढळून आली. याप्रकरणी संबंधीत तीन जणांसह तीन कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत महाळुंगे (ता. खेड) येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये शुभम एंटरप्रायजेस, बेसमॅक कॉम्पोन्टस प्रा. लि. व एल.पी.एस बोसार्ड प्रा. लि. या तिन्ही कंपन्यांतील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्यामुळे वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यात वीजमीटर यंत्रणेतील वायरिंगमध्ये फेरफार करून सीटीमध्ये (करंट ट्रान्सफॉर्मर) रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. या सर्कीटच्या सहाय्याने वीजप्रवाह सुरु असतानाही रिमोट कंट्रोलद्वारे मीटरमधील वीज वापराची नोंद सोयीनुसार थांबविता येत असल्याचे दिसून आले. यात एकूण 43,329 युनिटची म्हणजे 8 लाख 99 हजार 801 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी वीजग्राहक विजय मल्हारी खराबी व वीजवापरदार शुभम एंटरप्रायजेस, बेसमॅक कॉम्पोन्टस प्रा. लि. व एल.पी.एस बोसार्ड प्रा. लि. विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच चाकण परिसरातील खराबवाडी (ता. खेड) येथे रिलायबल इंजिनिअरिंग कंपनीमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने वीजमीटर यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यातही सीटीमध्ये (करंट ट्रान्सफॉर्मर) रिमोट कंट्रोलचे सर्कीट समाविष्ट केल्याचे आढळून आले. यात 42,432 युनिटची म्हणजे 5,49,231 रुपयांची वीजचोरी आढळून आली. वीजचोरीप्रकरणी वीजग्राहक विनोद शांताराम खराबी विरुद्ध कलम 135, 138 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
चाकणमधील नाणेकरवाडी (ता. खेड) येथील श्रेया लॉन्स या मंगल कार्यालयात वीजमीटर यंत्रणेत फेरफार करून 14,513 युनिटची म्हणजे 2,92,971 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले. याप्रकरणी वीजग्राहक विठ्ठल महादू नाणेकर विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या तिनही वीजचोर्या उघडकीस आणण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात उपसंचालक (दक्षता व सुरक्षा) कमांडर श्री. शिवाजी इंदलकर, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे (पुणे ग्रामीण मंडल), श्री. रमेश मलामे (चाचणी मंडल), उपमहाव्यवस्थापक श्री. एकनाथ चव्हाण (माहिती व तंत्रज्ञान), कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे (राजगुरुनगर), श्री. सुरेश वानखेडे (चाचणी), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. नितिन धर्माधिकारी, श्री. अजित पाटील, सहाय्यक अभियंता मंगेश सोनवणे, श्री. संजय जाधव, सौ. जया केवलिया, सहाय्यक दक्षता अधिकारी श्री. विजय गडसिंग, तंत्रज्ञ श्री. महेश दरेकर, श्री. रामकृष्ण सूर्यवंशी, श्री. जि. के. थिटे, श्री. गणेश सांडभोर आदींनी योगदान दिले.
वीजदर निश्चितीकरणासाठी
पुण्यात बुधवारी जनसुनावणी
महावितरणच्या प्रस्तावित वीजदर निश्चितीकरणाबाबत मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने बुधवारी (ता. 20) विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉलमध्ये जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी 10 वाजता प्रारंभ होईल.
महावितरणने आर्थिक वर्ष 2016-17 ते आर्थिक वर्ष 2019-20 साठी एकूण वार्षिक महसुलाची गरज आणि वीजदर निश्चितीकरण संदर्भात मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.