पुणे, दि. 04 : गणेश विसर्जनाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे व सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या कालावधीत वीजसेवेबाबत काही अडचणी, तक्रारी किंवा अन्य घटनांची माहिती देण्यासाठी नागरिकांनी किंवा गणेश मंडळांच्या सदस्यांनी 24 तास सुरु असणाऱ्या कॉलसेंटरच्या 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे आदी उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी वीजयंत्रणा किंवा फिडर पिलरवर चढू नये किंवा त्याचा आधार घेऊ नये. तसेच कोणत्याही वीजयंत्रणेला स्पर्श करू नये. कोणी असा प्रयत्न करीत असेल तर त्या व्यक्तीस वीजयंत्रणेपासून सुरक्षीत अंतरावर जाण्यास भाग पाडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे परिमंडलातील गणेश विसर्जनाच्या कालावधीत मोबाईल व्हॅनसह महावितरणचे अभियंता व कर्मचार्यांचे पथक उपलब्ध राहणार आहे. शहरातील महत्वाच्या लक्ष्मी रोड व टिळक रोडवरील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड येथे तात्पुरता नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येत आहे व मिरवणुक संपेपर्यंत हा नियंत्रण कक्ष सुरु राहणार आहे. गणेश विसर्जनाच्या कालावधीत विद्युत सेवेबाबत काही अडचणी आल्यास किंवा अन्य घटनांची माहिती द्यावयाची असल्यास संबंधित अधिकारी किंवा महावितरणच्या टोल फ्री 1912 किंवा 18002003435 किंवा 18002333435 क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.