पुणे-रास्ता पेठमधील अय्यप्पा धर्मपरिषदच्यावतीने अय्यप्पा मंदिरात केरळी बांधवानी फुलांची रांगोळी काढून ओणम सण साजरा केला . मंदिरात दहा दिवसापासून विविध प्रकारची आकर्षक अशी फुलांची रांगोळी काढून बळीराजाचे स्वागत केले जाते . अशी माहिती विजयम नायर यांनी दिली .
केरळी बांधव घरोघरी आठ ते दहा प्रकारच्या भाज्या तयार करतात तसेच प्रसाद म्हणून गोड खीर तयार केली जाते . एकमेकांच्या घरोघरी जाऊन केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेतात . आणि ओणम सणाच्या शुभेच्छा देतात . केरळी बांधव आपले सर्व सण नक्षत्रावर ठरवत असतात . तर राशींवर महिने ठरवितात .
यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन पौदवाल , उपाध्यक्ष सुब्रमण्यम अय्यर , सचिव शशांक नायर , महेश पौदवाल , बी. के. प्रमोद , विजू पौदवाल , राजेश पौदवाल ,जयंती नायर , एम. पी. नायर , सुरेश नायर , सतीश नायर , सुवर्णम नायर , रघु नायर , माधवन नंबियार आदीमान्यवर व केरळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .
केरळमध्ये घराघरात ओणम साजरा केला जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली जाते.
ओनम हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा उत्सव असून दसऱ्यासारखाच हा सण तिथं साजरा केला जातो. केरळमधील राजा महाबळीच्या शासनकाळापासून इथं हा उत्सव साजरा केला जातो.सर्वशक्तिमान महाबळी भगवान विष्णूचे भक्त होते. भगवान विष्णूचे आभार मानण्यासाठी त्यांनी महायज्ञ केला होता. तेव्हा वामन बनून भगवान विष्णू प्रकट झाले होते.वामन अवतारातील विष्णूनं महाबळीला तीन पाऊल ठेवण्याएवढी जागा मागितली, तेव्हा महाबलींना हसू फुटले होते.वामनाला तीन पावलं जागा दिल्यानंतर महाबळीनं पाताळात जाण्यापूर्वी त्यांच्याकडं एक वर मागितला. वर्षातून एकदा मला माझ्या प्रजेला भेटण्याची परवानगी द्यावी. त्यानुसार त्यांना दहा दिवस पृथ्वीवर राहण्याची परवानगी दिली गेली. हा काळ ‘ओणम‘ म्हणून साजरा केला जातो.
आपला दानशूर राजा भेटायला येणार म्हणून ओणम काळात त्यांचं फुलांनी स्वागत केलं जातं. सर्वत्र दिव्यांची रोषणाई केली जाते. ओणम काळात विष्णू पूजनानंतर महिला पारंपरिक नृत्य करतात. या दहा दिवसांच्या काळात मिरवणुका काढल्या जातात, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.अशी माहिती विजयम नायर यांनी दिली .