मुंबई: महावितरणच्या मुंबई मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या विशेष मदत कक्षामुळे ग्राहकांना नवीन वीजजोडणी तत्परतेने मिळत असून ग्राहकांच्या नावातील बदलही करून देण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हा ‘विशेष मदत कक्ष‘ सुरू करण्यात आला आहे.
नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी आणि ग्राहक नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल 2017 पासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाकडे एप्रिल व मे या दोन महिन्यांत सुमारे 326 ग्राहकांनी संपर्क साधला. यातील 170 ग्राहकांनी नवीन वीजजोडणीच्या संबंधात चौकशी केली. त्यापैकी 34 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. तसेच 156 ग्राहकांनी नावात बदल करण्याबाबत या कक्षाकडे मदत मागितली. त्यातील 9 ग्राहकांच्या नावात बदल करून देण्यात आला आहे. तसेच उर्वरित ग्राहकांच्या तक्रारी या मदत कक्षातर्फे कागदपत्रे तपासून सोडविण्यात येत आहेत.
नवीन वीजजोडणी, नावात बदल व वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी आपली तक्रार सोडविण्यासाठी 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.