मुंबई: विजेच्या मागणीत झालेली मोठी वाढ व उपलब्धतेत झालेली घट यामुळे राज्यात गुरुवारी महावितरणकडून सुमारे 1,500 मे.वॅ. चे आवश्यकतेनुसार तात्पुरते भारनियमन करण्यात आले होते. महावितरणकडून वीज उपलब्धता वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. महानिर्मिती व अदानी यांच्या वीज निर्मिती संचांपासून वीज उपलब्धतेमध्ये सुमारे 700 मे.वॅ. इतकी वाढ झालेली आहे.
राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी विजेच्या मागणीमध्ये सर्वसाधारण 2000 मे.वॅ. ने वाढ झालेली असून सद्यस्थितीत महावितरणची विजेची मागणी 18,000 ते 18,500 मे.वॅ. एवढी आहे. विजेची गरज भागविण्यासाठी महानिर्मिती, केंद्राकडून मिळणारा वाटा, खाजगी वीज उत्पादक तसेच विविध स्त्रोतांकडून महावितरण वीज खरेदी करीत आहे.
परंतु महानिर्मितीच्या संचापैकी कोराडी संच क्र. 10 (660 मे.वॅ.), खापरखेडा संच क्र. 2 (210 मे.वॅ.), परळी संच क्र. 8 (250 मे.वॅ.) तसेच अदानी संच क्र. 1 (660 मे.वॅ.), रतन इंडियाचे संच क्र. 4 व 5 (प्रत्येकी 270 मे.वॅ.) हे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. तसेच अदानी आणि रतन इंडिया यांच्या चालू असलेल्या संचामधून कमी वीजनिर्मिती होत आहे. यामुळे अंदाजे 3,000 मे.वॅ. पर्यन्त विजेची उपलब्धता कमी झालेली आहे.
याशिवाय देखभाल दुरुस्तीसाठी चंद्रपूर संच क्र. 7 (500 मे.वॅ.), कोराडी संच क्र. 6 (210 मे.वॅ.) केंद्राकडून मिळणारा सिपत संच क्र. 1 व तारापूर संच क्र. 4 (400 मे.वॅ.) नियोजितरित्या अगोदरच बंद केलेले असल्यामुळे विजेची उपलब्धता अंदाजे 4,000 मे.वॅ. ने कमी झाली आहे. एवढी उपलब्धता कमी होऊनही दि. 03 व 04 मे 2017 रोजी महावितरणकडून 1,000 ते 1,200 मे.वॅ. इतकेच भारनियमन करण्यात आले आहे. अकृषक ग्राहकांना 400 ते 600 मे.वॅ. एवढ्याच भारनियमनाला सामोरे जावे लागले.
महावितरणने दि. 05 मे 2017 पासून कृषीग्राहकांच्या स्वतंत्र वाहिन्यांवरील वीज उपलब्धता व वेळांमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. या वाहिन्यांवरून रात्री 1.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यन्त दोन टप्प्यांमध्ये रात्री 8 तास व दिवसा 8 तास तीन फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत भारनियमन कमीत कमी व्हावे यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून एक्सजेंज, बँकिग यांच्या माध्यमातूनही वीज उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महावितरणतर्फे विजेची मागणी व उपलब्धता यांचा मेळ घालून भारनियमन पूर्णपणे बंद करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.