मुंबई, दि. 2 :- दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित केल्याने महाराष्ट्र शासनाने हवाई मार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत.
यासंदर्भात नवीन निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत –
अ -भारत सरकारने वेळोवेळी लादलेले निर्बंध व निर्गमित केलेली मार्गदर्शक सूचना हे न्यूनतम निर्बंध म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई प्रवाशांसाठी लागू असतील.
ब- दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या राष्ट्रांना “हाय रिस्क” अर्थात उच्च जोखीम असलेले राष्ट्रांच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे
क -उच्च जोखीम असलेले राष्ट्रांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा ओमायक्रॉन विषाणू आढळल्यानंतर सध्या परिस्थितीच्या आधारे घेण्यात आलेला असून महाराष्ट्र शासनाला आवश्यकतेनुसार त्याचे अद्यतन करता येईल.
ड -खालील वर्गात मोडणाऱ्या हवाई प्रवाशांना उच्च जोखीम असलेले हवाई प्रवासी म्हणून घोषित करण्यात येईल-
उच्च धोका असलेल्या राष्ट्रांमधून महाराष्ट्रात दाखल होणारे सर्व हवाई यात्रेकरू.
असे हवाई प्रवासी की ज्यांनी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर 15 दिवसात उच्च जोखीम असलेल्या राष्ट्रांना भेट दिलेली आहे.
ई -भारत सरकारने पूर्वीच लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त केवळ उच्च धोका असलेल्या हवाई यात्रेकरूंसाठी खालील निर्बंधही लागू असतील:-
“उच्च जोखीम असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि पडताळणी करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच तात्काळ आर टी पी सी आर चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आर टी पी सी आर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल.
या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळलयास अश्या हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या इस्पिताळात दाखल करण्यात येईल आणि जर सातव्या दिवशी घेतलेल्या आर टी पी सी आर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा उच्च जोखीम असणाऱ्या हवाई यात्रेकरूंना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल.”
फ- उपयुक्त (इमिग्रेशन) तसेच एफ आर आर ओ यांना असे निर्देश देण्यात आले आहे की, विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या- ज्या देशांना भेटी दिलेल्या आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे.
त्याचप्रमाणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एम आय ए एल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाईन्सकडेही द्यावी जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.
ग- देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या ७२ तासाअगोदरचे आर टी पी सी आर ‘निगेटिव’ अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.