मुंबई, दिनांक ३० ऑक्टोबर
महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ (Pedro Sanchez) यांनी प्रशंसा केली आहे. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्याशी काल (दि २९) येथील राजभवनमध्ये चर्चा करतांना श्री सांचेझ यांनी डॉ गोऱ्हे यांच्याकडून महाराष्ट्र शासनाकडून शाश्वत विकासासाठी जिल्हा स्तरावर कोणकोणत्या प्रकल्पांना उत्तेजन दिले जाते, याबद्दलही माहिती घेतली.
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी बेगोना गोमेझ (Begona Gomez) तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई भेटीवर आलेले स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचे काल (मंगळवार) शासनाच्यावतीने राजभवन येथे स्वागत केले. यावेळी सांचेझ यांच्या पत्नी बेगोना गोमेझ तसेच उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित होते.
महामहिम राज्यपालांनी श्री सांचेझ व त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ राजभवन येथे स्नेहभोजन आयोजित केले होते. याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सहभाग नोंदवला. डॉ गोऱ्हे यांनी श्रीमती बेगोना गोमेझ यांच्याशी संवाद साधला. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या योजना, विविध शासनातर्फे करण्यात येत असलेले सांघिक प्रयत्न याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (United Nations) लिंग समानता आणि महिला विषयक समानतेच्या मुद्द्यावर स्पेन सरकार काय काम करते याबद्दलची माहिती श्रीमती बेगोना गोमेझ यांनी डॉ गोऱ्हे यांना दिली.
महाराष्ट्र शासनाचे सामाजिक उपक्रम, वेगवेगळ्या जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न तसेच जिल्हा स्तरावर हे उपक्रम राबवण्यासाठी देण्यात येत असलेले प्रोत्साहन हे ऐकून श्रीमती बेगोना गोमेझ अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांनी ही बाब पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर पंतप्रधान श्री
सांचेझ यांनीही डॉ गोऱ्हे यांच्याशी संवाद साधून महाराष्ट्र सरकार राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल उत्सुकता दाखवली आणि प्रशंसा केली.
यावेळी राज्य शासनातील उच्चपदस्थ अधिकारीदेखील उपस्थित होते.