पुणे : आयुष्यात येणा-या प्रत्येक आव्हानाचा सामना करीत वाटा शोधणा-या चिमुकल्यांना आनंदाचे दोन क्षण त्यांच्यासाठी आयोजित एका आनंदमेळाव्याने मिळवून दिले. लगोरीचा खेळ, फुग्यांची सजावट आणि केकच्या मेजवानीचा मनमुराद आनंद लुटताना दिव्यांग मुलांच्या चेह-यावर निरागस हसू उमलत होते. जागतिक अपंग दिन व माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात विशेष मुलांसह सामान्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, आम्ही तुमच्यातीलच एक आहोत, असे सांगत एकोप्याचा संदेशही दिला.
दिव्यांग मुलांनी लुटला खेळ व मनोरंजनाचा मनमुराद आनंद-
जागतिक अपंग दिन व माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदमेळाव्याचे आयोजन
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात या कार्यक्रमाचे आयोजन दारुवाला पुलाजवळील जीवनधारा मतिमंद मुलांच्या विद्यालयात करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पीयुष शहा आदी उपस्थित होते. संस्थेतील मुलांना खेळणी आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
मोहन जोशी म्हणाले, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे अर्थ आपल्या अंगी बाणवत संपूर्ण आयुष्यात आपण समाजासाठी काम केले पाहिजे. दिव्यांग मुले ही कोणाचा तरी आधार घेऊन आयुष्यात पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची साथ देत त्यांच्या आयुष्यात आनंदाने क्षण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. सामान्य नागरिकांनी अशा मुलांसोबत संपूर्ण वर्षातील किमान एक दिवस देऊन त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
याशिवाय माजी आमदार मोहन जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर, वृद्धाश्रमात फळे वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.