छत्रपती संभाजीनगर-काही नेते स्वतःच्या स्वार्थाकरता तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे या हेतूने राजकीय स्टेटमेंट देत असल्याचा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे .छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीमागे देवेंद्र फडणवीस हेच मास्टरमाईंड आहेत, असा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्याला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खरे तर अशा तणावपूर्ण स्थितीत कसे वागावे हे नेत्यांनी समजून घेण्याची गरज आहे. अशा कोणीही परिस्थितीत चुकीची वक्तव्ये करत असतील तर कृपया त्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. सर्वांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत राहील, हे पाहणे सर्वांची जबाबदारी आहे. अशा स्थितीतही कुणी याला राजकीय रंग देण्याच प्रयत्न करत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काही नाही.
कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले नाही-दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 4 महिन्यांत निघालेले सुमारे 50 हिंदू जनजागृती मोर्चे व त्यातील भाषणांवरून सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे. काेर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोर्टाने महाराष्ट्र सरकारबाबत हे निरीक्षण केलेले नाही. याऊलट महाराष्ट्र सरकारने मोर्चे निघल्यानंतर काय कारवाई केली? हे दाखवल्यावर कोर्टाने कुठलेही तसे वक्तव्य केलेले नाही.सुप्रीम कोर्टाने एकंदरित सर्वच राज्यांच्या बाबतीत ताशेरे ओढणारे विधान केले. केवळ महाराष्ट्राला कोर्टाने असे म्हटले, असे जे सांगत आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टाचे कामकाज कळत नाही, असेच म्हणावे लागेल.