एमपॉवर’ संस्थेच्या पुढाकाराने भिंती चित्रांतून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती;
पुणे : “मानसिक आरोग्य चांगले राहावे, आपापसांत सुदृढ व मुक्त संवाद व्हावा, यासाठी कला हे माध्यम उपयुक्त आहे. नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडविण्याची ताकद कलेमध्ये असते. अशा कलात्मक उपक्रमांतून मानसिक आरोग्याची जनजागृती प्रभावी ठरते. भिंती चित्रांतून मानसिक आरोग्याचा संदेश देण्याचा व जागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे मत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट संचालित ‘एमपॉवर’ संस्थेच्या अध्यक्ष डॉ. नीरजा बिर्ला यांनी व्यक्त केले.
आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट संचालित एमपॉवर संस्थेच्या वतीने मानसिक आरोग्यासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या ‘आर्ट एक्सप्रेस’ या कलात्मक उपक्रमावेळी डॉ. नीरजा बिर्ला बोलत होत्या. एमपॉवर संस्थेच्या वतीने चिंता, निराशा, कामाचा ताण आणि नातेसंबंधांतील समस्या, तसेच मुलांमधील अतिचंचलतेसारख्या विविध मानसिक समस्यांसंदर्भात जनजागृतीसाठी ‘आर्ट एक्सप्रेस’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत रक्षक चौक-जगताप डेअरी ते औंध बीएआरटी रस्ता ते पिंपरी या दरम्यानची साडेतीन हजार चौरस फुटांच्या भिंतीवर मानसिक आरोग्याशी संबंधित सुंदर व कलात्मक चित्रे, संदेश रंगवण्यात आले. मानसिक आरोग्याविषयी मुक्त संवादाला चालना देणे आणि सकारात्मक मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देणारी ही विचारप्रवण चित्रे आहेत. पुण्यातील ग्राफिटी कलाकार कार्तिकेय शर्मा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम झाला. यावेळी ‘एमपॉवर’च्या उपाध्यक्षा (ऑपरेशन्स) परवीन शेख व पुणे सेंटरच्या प्रमुख स्नेहा आर्य आदी उपस्थित होते. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, कंपन्यांचे कर्मचारी आणि पुणेकरांसह अनेकांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. पन्नास कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन हजार स्वयंसेवकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.
कार्तिकेय शर्मा म्हणाले, “सर्व लोकांना आल्हाददायक, आनंदी अनुभूती देण्याची ताकद कलेमध्ये आहे. त्यात जात, धर्म, वय, वंश अशा कोणत्याही गोष्टी अडसर ठरत नाहीत. मानसिक आरोग्यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत जनजागृतीसाठी कलेचे माध्यम वापरले जात आहे आणि त्याचा भाग बनण्याची संधी मिळत आहे, ही आम्हा कलाकारांसाठी अभिमानाची बाब आहे.”
‘एमपॉवर’ हा आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम असून मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, मानसिक आरोग्यासंबंधी एकात्मिक सेवा पुरविणे आणि सामान्य नागरिकांचे मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी समर्पित आहे. आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालयात ५००० चौ. फूट जागेत स्टेट-ऑफ-आर्ट सुविधांसह एमपॉवर संस्था उभी आहे. संस्थेकडे उत्तम मानसोपचारतज्ज्ञ, मानसोपचार वैद्य, स्पीच थेरपीस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, मुले आणि प्रौढांसाठी मानसोपचार वैद्यांची टीम आहे. मानसिक आरोग्यासाठी सर्वांगीण साहाय्य आणि मानसिक आरोग्यासंबंधी मुक्त संवाद तसेच आधाराला प्रोत्साहन देणारी संस्कृती निर्माण करण्यासाठी एमपॉवर संस्था कटिबद्ध आहे, असे परवीन शेख यांनी नमूद केले.