एकनाथराव लाइटली घेऊ नका. चेष्टेने घेऊ नका , जनता हे सगळे बघत असते..
मुंबई- अगोदर तब्बल तीन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेल्या भूषण देसाईंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश दिला गेला. त्यानंतर आमदार रमेश पाटील आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरात वरून येते. आमच्याकडे जो साफ होईल, असे वक्तव्य विधान परिषदेत करतात. हे निषेधार्ह आहे. जर ते असतील तर अशा घोटाळेखोरांवर पांघरुण घालू नका. त्यांची चौकशी करा, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत घेरले.भाजप आमदार अतुल भातखळकरांनी भूषण देसाई यांच्यावर एमआयडीच्या जमिनीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याचा दाखलाही अजित पवारांनी सभागृहाला दिला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत चौफेर फटकेबाजी करत मुख्यमंत्र्यांना नामोहरम केले. हे सरकार सत्तेवर आल्यापासून काही काही सन्माननीय सदस्यांच्या सुरू असलेल्या चौकशा बंद झाल्या. ते शिंदे साहेबांसोबत गेल्यामुळे लगेचच स्वच्छ आणि एकदम धुतल्या तांदळासारखे झाले. हे जे प्रकार सुरू आहेत, ते लोक बंद डोळ्यांनी बघत नाहीत. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला देखील बसेल, असा इशारा त्यांनी दिला.
अजित पवार म्हणाले, भाजपच्या लोकांनी सपोर्ट केला म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. चाळीसमध्ये कुणी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. एकशे पंधरा लोकांचे पाठबळ तुम्ही त्यांना दिले. अतुल भातखळकर सभागृहात म्हणाले होते, गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्रात एमआयडीसीत ४ लाख १४ हजार चौरस मीटरच जागा औद्योगिकरणासाठी राखीव होती. मात्र, ती थेट बेकायदीशरपणे रहिवासी वापरामध्ये परावर्तीत केली. त्यातून ३ हजार १०९ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळायला हवा होता. मात्र, त्याऐवजी फक्त १६८ कोटी मिळाले. म्हणजे तीन हजार कोटींचा घोटाळा झाला.
अजित पवार म्हणाले, अतुल भातखळकर यांनी या घोटाळ्याप्रकरणी भूषण देसाई यांचे नाव घेतले होते. आता काही दिवसांपूर्वी भूषण देसाईंना शिंदे गटात घेतले. त्याचंच्यावर तुम्ही तीन हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ते लगेच स्वच्छ झाले. त्यामध्ये कुठेही काहीही अडचण राहिलेली नाही. नेमका हाच विषय आमदार रमेश पाटील यांनी विधान परिषदेत काढत घोटाळेखोरांची पाठराखण केली. भूषण देसाई यांचा विषय काढल्यावर ते म्हणाले, कोणीतरी भूषण देसाई यांनी एमआयडीसीमध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मात्र, हा भ्रष्टाचार झाकण्यासाठी ते आलेले नाहीत. हे सरकार चांगले चालले आहे म्हणून ते आले. त्यांना न्याय देणार आहे, म्हणून ते आले. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती आम्ही गुजरातवरून आणतो. त्यामुळे आमच्याकडे जो माणूस येईल, तो स्वच्छ होईल. आणि हे खरे आहे. असेही सांगायला ते कमी करत नाहीत, काय चाललेय सरकारमध्ये असा सवाल त्यांनी शिंदे यांना केला.
अजित पवार पुढे म्हणाले की, एकनाथराव तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. लाइटली घेऊ नका. तुम्हाला असे वाटते हे काही नाही. आपण चेष्टेने घेतो. परंतु राज्यातील जनता हे सगळे बघत असते. मागे भाजपच्याच एका खासदाराने सांगलीमध्ये सांगितले की, मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे मला कुठल्या चौकशीची भीती नाही. शांत झोप येते. त्यानंतर आमच्या भागातले पुणे जिल्ह्यातले एक कॅबिनेट मंत्री होते ते स्वतः भाषणामध्ये म्हणाले, मी आता भाजपमध्ये आलोय. बाकीच्यांना शांत झोपा येत नाहीत. मात्र, मला शांत झोप येते. कारण मी भाजपमध्ये आलोय. ही कुठली पद्धत आहे? सर्वसामान्य माणूस बघतोय. ज्या भूषण देसाईंबद्दल इतके गंभीर आरोप आहेत. त्यांची चौकशी करा, पाठिशी घालू नका, असे आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे यांना केले.