विविध गुणदर्शन कार्यक्रमातून चिमुकल्यांनी सादर केले कलागुण; शनिवार पेठ मेहुणपूरा सार्वजनिक गणेशोत्सव आणि सामाजिक संस्था आणि दानशूरांचा सहभाग
पुणे : दिवाळी हा आनंद, प्रेम आणि आपुलकीचा सण. मात्र, कुटुंबाचा आधार नसलेल्या अनाथ मुलांच्या आयुष्यात या सणाचा आनंद फुलवण्यासाठी केवळ भेटवस्तू नव्हे, तर मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब आणि कौतुकाची थापही तितकीच महत्त्वाची असते. या मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण व्हावेत, त्यांनाही दिवाळीचा सण आपलेपणाने साजरा करता यावा, या भावनेतून शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने ससून रुग्णालय आवारातील श्रीवत्स संस्थेतील मुलांसोबत आपुलकीची दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. विविध गुणदर्शन कार्यक्रमातून मुलांनी आपले कलागुण सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर, ॲड. शिरीष शिंदे, मंदार ठाकूर देसाई, नितीन पंडित, गायक राहुल जोशी, गायिका रश्मी मोघे, कुमार रेणूसे, आनंद सराफ उपस्थित होते.
यावेळी श्रीवत्समधील मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमातून आपल्यातील कलागुण सादर करीत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. मुलांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. मुलांसोबत संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच संस्थेला आवश्यक मदतीचे सहकार्य करण्यात आले.
पराग ठाकूर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला समाजातील विविध संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभत आहे. सुरुवातीला ५०० रुपयांच्या मदतीपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा आज मोठा विस्तार झाला आहे. समाजातील वंचित आणि गरजू घटकांना आवश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदत करण्याबरोबरच त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. श्रीवत्समधील मुलांसोबत दिवाळी साजरी करताना त्यांना आनंदाचे क्षण देता येतात, याचे समाधान वाटते.
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, इमर्सन कंपनी, कोष्टी व कुटुंबीय, नू. म. वि. प्राथमिक शाळा, आफळे अकॅडमी, वेनस्डे क्लब, ठाकूर देसाई कुटुंबीय आणि अभेद्य वाद्य पथक या संस्थांनी उपक्रमात सहभाग घेतला.

