पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्याबाहेर मद्यपींचा राडा! बाटल्या फेकल्या, पोलीस कर्मचारी जखमी; पोलिस आयुक्तांवर शिरसाटांचा गंभीर आरोप

Date:

तीन मद्यपी तरुणांचा गोंधळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात; ‘पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय?’ म्हणत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : राज्याचे पालकमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याबाहेर गुरुवारी (१२ नोव्हेंबर) रात्री मद्यपी तरुणांनी गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास तीन तरुणांनी बंगल्याच्या परिसरात गोंधळ घालत सुरक्षारक्षकांशी वाद घातला. एवढेच नव्हे, तर बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्याही भिरकावल्याचा आरोप आहे. या झटापटीत एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. सातारा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी थेट पोलिस आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

सुरक्षारक्षकांशी वाद, बंगल्याच्या दिशेने बाटल्या फेकल्या

मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिरसाट यांच्या गोलवाडी येथील बंगल्याच्या मागील बाजूस काही तरुण मद्यपान करत होते. बंगल्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना हटकले. यावरून तरुण आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. या तरुणांनी ‘अनेक ओएसडी माझ्या खिशात आहेत’, अशी धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

वादाचे रूपांतर पुढे झटापटीत झाले. यावेळी तरुणांनी बंगल्याच्या दिशेने रिकाम्या बाटल्या भिरकावल्याचा आरोप आहे. या प्रकारात सुरक्षारक्षक आणि तरुणांमध्ये झटापट झाली. त्यात एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन तरुणांना ताब्यात घेतले.

‘माझ्या घरावर हल्ला होतोय, पोलिस आयुक्तांचा फोन बंद!’

या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिस आयुक्तांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला.

शिरसाट म्हणाले, “शहरात अशा अनेक घटना घडत आहेत. दिवसाढवळ्या खून होत आहेत आणि पोलिस आयुक्तांना त्याचे गांभीर्य नाही. माझ्या घरावर हल्ला होतोय आणि पोलिस आयुक्तांचा फोन बंद आहे. एकही डीसीपी किंवा एसीपी उपलब्ध नव्हता. शेवटी रात्री बारा वाजता राज्याच्या डीजींना फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.”

‘पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय?’

पोलिसांच्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त करताना शिरसाट यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित केला. “पालकमंत्र्यांची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय?” असा सवाल त्यांनी केला. तसेच या संपूर्ण प्रकाराची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्तांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

या घटनेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच असा प्रकार घडल्याने सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, पोलिस आयुक्तांशी संपर्क होऊ न शकल्याचा आणि वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याचा शिरसाट यांचा आरोपही चर्चेचा विषय ठरला आहे.

आता या प्रकरणात पोलिस प्रशासन काय भूमिका घेते, तसेच पालकमंत्र्यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री आणि गृह विभागाकडून काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मायक्रोसॉफ्टचा जगभरात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पुणेसह तीन विमाने रद्द, दोन उड्डाणांना विलंब!

आउटलुक, टीम्स आणि मायक्रोसॉफ्ट ३६५ सेवांना मोठा फटका; सुमारे...

छठ पूजेच्या नावाखाली भाजप संघर्ष पेटवतोय, त्यांच्या सापळ्यात अडकू नका:उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीच हा आटापिटा- राज ठाकरेंचा आरोप

'यूपी निवडणुकांसाठी महाराष्ट्रात वाद पेटवण्याचा डाव' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

चार हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला चतु:शृंगी देवी मंदिर परिसर

राष्ट्रीय कला अकादमी आणि श्री चतु:शृंगी देवी देवस्थानच्या संयुक्त...