पुणे : गोखलेनगर येथील सुयोग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडाची आकर्षक प्रतिकृती साकारली.
गडाची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार आणि मंदिराची रचना साकारून ऐतिहासिक जेजुरी गडाचे दर्शन घडविले. गडावरील भव्य दीपमाळा, दगडी पायऱ्या आणि तटबंदी ही येथील वैशिष्ट्ये प्रतिकृतीत दर्शविण्यात आली आहेत.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेला जेजुरी गड हा खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या गडाला धार्मिक महत्त्वाबरोबरच ऐतिहासिक वारसाही लाभला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांच्या भेटीच्या ऐतिहासिक परंपरेशी जेजुरीचा संबंध आहे. पेशवे आणि होळकर घराण्यांनीही गडाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा जपत नव्या पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम राबविला.
शुभम वाईकर, मंगेश तडके, अक्षय माने, संतोष चौधरी, साईराज बढे, साक्षांत शिरसेकर, ओमकार सुपेकर आणि ॲरोन त्रिभुवन यांनी ही प्रतिकृती साकारली.

