मुंबई, दि. 15 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य शिरीष चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने ट्रक तसेच गोदामात साठा करुन ठेवलेला 6 लाख 70 हजार 150 रुपये किमतीच्या 729 गोण्या रेशनचा तांदूळ महसूल आणि पोलिसांच्या पथकाने पकडला आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर रोजी दोषींवर कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी आणखी काही लिंक आहे का हे तपासून घेण्यात येत आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील मेहुणबारे पोलीस ठाण्यात 20 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.