मुंबई- केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तेलंगणामध्ये काढलेल्या ‘लोकशाही वाचवा’ रॅलीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. फक्त सत्ता मिळून उपयोग नसतो, तर ती अंगातही असावी लागते. पण भाजप अद्याप विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही आणि दुसरीकडे काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणजे काय, हे आता कुठे कळू लागलं आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वतःच सत्तेत बसलेलं असताना लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात, असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी यावेळी विचारला आहे.
कार्टुनिस्ट अलोक यांनी पु. ल. देशपांडे यांच्यावर तयार केलेल्या दिनदर्शिकेचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींच्या एका ट्विटचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. आधी आलेला निवडणुकीचा अंदाज चुकला. त्यापूर्वीच काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ही विधान परिषदेची निवडणूक आहे. ती काही ठिकाणी झाली. त्यावर पंतप्रधान ट्विट करतात? मी आजवर कोणत्याच पंतप्रधानांनी असं ट्विट केलेलं पाहिलं नाही. कारण भाजप अजूनही विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतून बाहेरच आलेला नाही.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी पु. ल. देशपांडे यांचा एक भन्नाट किस्सा ऐकवला. ते म्हणाले की, पुलंना बघण्याचा अनुभव अनेकदा आला, पण प्रत्यक्ष भेटण्याचा योग मात्र एकदाच आला. बाळासाहेब ठाकरे आणि पुलंचा वाद होऊन सहा महिने झाले होते आणि त्यावेळी मी पुण्यात होतो. मला त्यांना भेटावंसं वाटलं, पण माझी त्यांच्याशी ओळख नव्हती. तेव्हा मी माझे सासरे मोहन वाघांना फोन केला आणि म्हटलं, ‘मला पुलंना भेटायचं आहे.’ त्यांनी पुलंशी चर्चा केली आणि सकाळी 8 वाजता भांडारकर रोडवरील त्यांच्या घरी भेटायचं ठरलं. मी सकाळी तिथे पोहोचलो, पुलं आतल्या इमारतीत राहत होते. माझ्या मागून एक माणूस येत होता, मी इमारतीत शिरलो तर तोही शिरला. मी एका दरवाजाची बेल वाजवली, तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला, ‘राज तिथे नाही, इथे.’ मी भलत्याच्याच दरवाजाची बेल वाजवत होतो,” अशी मजेशीर आठवण राज यांनी सांगितली.
पुढे राज ठाकरे यांनी सांगितलं की, सुनिता बाईंनी मला आत बोलावलं. मला तो दरवाजा आठवतो. बाजूला पुस्तकं होती. मी आत गेलो. त्यावेळी पुलंची तब्येत बरी नव्हती. तो माणूसही आत बसला. मला वाटलं तो त्यांच्या परिचयाचा असावा. मग सुनीता बाईंनी गप्पा मारायला सुरुवात केली. बाळासाहेबांचे किस्से सांगायला लागल्या. त्या म्हणाल्या, बाळ (बाळासाहेब ठाकरे) हा भाईंचा (पुलं देशपांडे) विद्यार्थी आहे. आणि श्रीकांत (श्रीकांत ठाकरे) हा माझा विद्यार्थी आहे. त्यानंतर त्या बाजूला बसलेल्या माणसाने पुलंकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणाला, बाळासाहेब तुमचे विद्यार्थी? त्यावर पुलंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, आदर वाढला असेल ना आता माझ्याबद्दल.
त्याही प्रसंगात तब्येत बरी नसताना पुलंचा ह्युमर गेला नव्हता. नंतर मी बाहेर आलो. आणि बाळासाहेबांना फोन केला. पुलंना भेटल्याचं सांगितलं. पुलंची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबईला आलो. बाळासाहेबांना घेऊन पुन्हा पुण्याला आलो. तेव्हा पुलं आणि बाळासाहेबांची भेट झाली. त्यामुळे मला दोनदा पुलंना भेटण्याची संधी मिळाली. मी आधीच भेटायला हवं होतं. पण आजारपणात का होईना त्यांना भेटलो ही काय कमी गोष्ट आहे का?, असा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला.

