‘वंदे मातरम् १५०’ उपक्रमासाठी स्थायी समितीची मान्यता
पुणे, ३० : देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींचा पुणे महापालिकेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. ‘वंदे मातरम्’ या ऐतिहासिक राष्ट्रगीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ‘वंदे मातरम् १५० – संकल्प देशवासीयांचा, पुढाकार पुणेकरांचा’ या उपक्रमांतर्गत ५० वीरमाता आणि वीरपत्नींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशेव्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ७ नोव्हेंबर २०२६ रोजी शनिवारवाडा येथे ३६ हजार दीपप्रज्वलनाचा विश्वविक्रमी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या माता आणि पत्नींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात एकूण ५० वीरमाता आणि वीरपत्नींना प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे एकूण १२ लाख ५० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेच्या समाज विकास निधीतून आवश्यक रक्कम उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे.
देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्यांच्या त्यागाचा सन्मान करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वीरमाता आणि वीरपत्नींच्या सन्मानासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच संबंधित प्रशासकीय व आर्थिक कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

