– सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई–हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेवून काम करीत आहे. या स्मारकाबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याच्या किंमतीत आता वाढ झाली आहे.या स्मारकाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती तयार करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य दिलीप मोहिते-पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खेड (राजगुरुनगर) येथे शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, स्मारकासाठी यापूर्वीही निधी देण्यात आला होता. पर्यटन विभागानेही ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. राजगुरुनगर हे ऊर्जेचे, पराक्रमाचे, वीरतेचे केंद्र व्हावे, असे काम शासन करेल, असेही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य अतुल भातखळकर यांनी सहभाग घेतला.