500 कोटींच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे जरांगेंना प्रत्युत्तर:‘पुरावे असतील तर यंत्रणांकडे द्या, दूध का दूध, पानी का पानी होऊ द्या’

Date:

‘500 कोटी घेतलेही नाहीत, दिलेही नाहीत’; जरांगेंना पुरावे सादर करण्याचे आव्हान

मुंबई–मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून केलेल्या आरोपांना शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी 500 कोटी रुपये कोणाला दिलेही नाहीत आणि कोणाकडून घेतलेही नाहीत. आरोप करण्यापूर्वी त्याची शहानिशा करायला हवी होती. जरांगे यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते संबंधित यंत्रणांकडे द्यावेत. या प्रकरणाची चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी झाले पाहिजे,’ असे शिंदे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या विधानावरूनही शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मोदी आणि शाह यांच्यावर आरोप केले की त्याची ब्रेकिंग न्यूज होते, असा टोला लगावत त्यांनी विरोधकांवर सत्तेविना तडफडत असल्याची टीका केली.

मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्यात 500 कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. शिंदे यांनी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये असल्याचा दावा जरांगे यांनी केला होता. यासंदर्भात शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांना नेमके काय सांगितले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘कुणाला 500 कोटी रुपये दिलेही नाहीत आणि 500 कोटी रुपये घेतलेही नाहीत. देण्याचा प्रश्नच येत नाही. मनोज जरांगे पाटील ज्या काही आधारावर बोलत असतील, तर त्यांनी आधी त्याची शहानिशा करायला हवी होती. शहानिशा केल्यानंतरच बोलायला पाहिजे होते. त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील, ते त्यांनी सादर करावेत.’’

जरांगे यांनी पुरावे देण्याबाबत भूमिका मांडल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. संबंधित यंत्रणांकडे पुरावे सादर करून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. सत्य समोर आले पाहिजे, असे ते म्हणाले.
‘‘एकनाथ शिंदे यांना संपूर्ण महाराष्ट्र आणि देश ओळखतो. माझ्या कामाची पद्धत सर्वांना माहीत आहे. अनेक जण एकनाथ शिंदे यांचे नाव घेऊन हेडलाईन करण्याचा प्रयत्न करतात,’’ असा आरोपही त्यांनी केला.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या सरकारने घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. जरांगे हे मराठा समाजासाठी काम करत असल्याने आपणही त्यांना मदत केली होती; मात्र त्यांनी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, राजकीय व्यासपीठ तयार करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

‘‘मनोज जरांगे मराठा समाजाचे काम करत होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री असताना समाजाला न्याय देण्याचे काम केले. कुणबी प्रमाणपत्रे, आरक्षण आणि 5,300 लोकांना अधिसंख्य पदांवर नोकऱ्या देण्यासारखे निर्णय आम्ही घेतले. गेल्या अनेक दशकांपासून मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना जे करता आले नाही, ते आम्ही करून दाखवले,’’ असा दावा शिंदे यांनी केला.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी केले नाही अथवा कोणाचे आरक्षण काढून घेतले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रक्रियेला सुरुवात झाली होती आणि आजही आरक्षण टिकून असल्याचे शिंदे म्हणाले.

जरांगे यांनी समाजाच्या प्रश्नांसाठी काम करावे, त्यांच्या आंदोलनाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, जरांगे यांनी या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर करण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत केलेल्या विधानावरूनही एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप केले की माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या आणि हेडलाईन्स होतात, असे सांगत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

‘‘आता त्यांना काय कामधंदा उरला आहे का? कोणाच्या तरी गर्दीत जाऊन घुसायचे, माईक घ्यायचा आणि भाषण ठोकायचे. त्यांच्याकडे गर्दी आणि माणसेही नाहीत. त्यामुळे दुसऱ्याच्या व्यासपीठावर जाऊन तिसऱ्यांवर बेछूट आरोप करायचे, एवढेच सुरू आहे,’’ अशा शब्दांत शिंदे यांनी टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे गेला, तर अमित शाह यांनी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली, असे शिंदे म्हणाले. अशा नेत्यांवर वारंवार आरोप करणे ही कोणती राजकीय पातळी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देशात सत्ताबदल घडवून आणण्याच्या विरोधकांच्या विधानांवरही शिंदे यांनी टीका केली. ‘रिझिम चेंज करणार, हे करणार, ते करणार,’ असे म्हणणाऱ्यांना त्यांनी सवाल केला.

‘‘तुम्ही कोण सत्ता परिवर्तन करणारे? सत्ता कोणाच्या हातात द्यायची आणि कोणाला सत्तेतून खाली उतरवायचे, हे जनता ठरवत असते. त्यासाठी काम करावे लागते. घरात बसून सत्ता परिवर्तन होत नसते,’’ असे शिंदे म्हणाले.

विरोधकांना जनतेने वारंवार नाकारल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांवर सत्तेविना अस्वस्थ झाल्याची टीका केली. ‘‘मासा जसा पाण्याविना तडफडतो, तसे हे सत्तेविना तडफडत आहेत. सत्ता मिळत नाही आणि जनता सत्ता देणार नाही, असे वाटल्यामुळे देशात अराजकता आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.

देशात नेपाळ, बांगलादेश किंवा पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशा विधानांवरही त्यांनी आक्षेप घेतला. ‘‘हा नेपाळ नाही, बांगलादेश नाही, श्रीलंका नाही किंवा पाकिस्तानही नाही. हा हिंदुस्तान आहे. येथे लोकशाही आहे,’’ असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याच्या मुद्द्यावरूनही शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधी पक्षनेता असताना सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात धरायचे आणि दुसरीकडे संविधानाच्या मूल्यांना धक्का पोहोचेल, अशी भूमिका घ्यायची, असा आरोपही त्यांनी केला.

विरोधक देश जोडण्याऐवजी देश तोडण्याचे काम करत असल्याची टीका करत, अशा भूमिकेचा जनतेने निषेध करावा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याबाबतही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. हा सोहळा अविस्मरणीय आणि भव्य स्वरूपाचा असेल. कुंभमेळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मंगलमय वातावरण निर्माण होईल, असे ते म्हणाले.

या सोहळ्याला राष्ट्रपतींनी उपस्थित राहावे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांना निमंत्रण दिल्याची माहिती दिली. राष्ट्रपती या सोहळ्याला उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जरांगेंचा इशारा; ‘500 कोटींच्या आरोपांचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही’

एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपच्या काही नेत्यांकडून या कथित व्यवहाराची चर्चा होत असल्याचा दावा करत त्यांनी शिंदे यांना थेट प्रश्न विचारले.

‘‘शिंदे साहेब, तुम्ही भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल असे सांगितले का, की जरांगे पाटलाला 500 कोटी रुपये द्यायचे आहेत? तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिले, असे भाजपच्या नेत्यांना सांगितले का? याचा छडा लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही,’’ असे जरांगे म्हणाले.

या कथित व्यवहाराबाबत पुरावे सादर करण्याची भूमिका जरांगे यांनी मांडली आहे. दुसरीकडे, शिंदे यांनी आरोप फेटाळत पुरावे संबंधित यंत्रणांकडे देण्याचे आव्हान दिले आहे. त्यामुळे जरांगे पत्रकार परिषदेत नेमके कोणते पुरावे सादर करतात आणि या आरोपांवर पुढे काय कारवाई होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात घरोघरी प्रचार

मतदानासंदर्भात मार्गदर्शन करत मतदारांना मतदानाचे आवाहन भाजप-महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना विजयी...

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

पुणे, दि.२१: स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे...

पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर दसरा उत्साहात

श्रीनगर : काश्मीरमधील सामाजिक सलोखा आणि धार्मिक सहअस्तित्वाची परंपरा...

राज ठाकरे यांच्या हस्ते मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या लोगोचे अनावरण

पुण्यात २५ ते २७ डिसेंबरदरम्यान संमेलन; ज्येष्ठ व्यंगचित्रकार लहू...