जनरल व नेत्रतपासणीसह मोतीबिंदू तपासणीची सुविधा उपलब्ध
पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने श्री आदर्श मंडळ यांच्या वतीने, महा एनएमओ, महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आणि जयतु सोशल फाउंडेशनच्या सौजन्याने ‘आदर्श सेवा ओपीडी’ सुरू करण्यात आली. या केंद्रात जनरल ओपीडी, नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू तपासणीची सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात येणार असून, भवानी पेठ परिसरातील गरजू नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
या आरोग्यसेवा केंद्राचे उद्घाटन पुणे असोसिएशनचे अध्यक्ष फतेचंद रांका यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी श्री आदर्श मंडळाचे अध्यक्ष सुभाष ओसवाल, जयतु सोशल फाउंडेशनच्या संस्थापक कल्याणी पूजा सुकेश रणसिंग, समन्वयक गणेश मोरे, गौरी तारू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह राहुल पुंडे, महा एनएमओचे डॉ. प्रशांत चौधरी, डॉ. आशुतोष जपे, डॉ. फाल्गुनी जपे आणि डॉ. उमरजी यांच्यासह विविध मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
आर्थिक अडचणींमुळे अनेक नागरिकांना वेळेवर आरोग्य तपासणी करून घेता येत नाही. विशेषतः झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा मिळवताना अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य तपासणी, नेत्रविषयक समस्यांची तपासणी आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळणार आहे. गरजेनुसार पुढील उपचारांसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे.
श्री आदर्श मंडळ, महा एनएमओ, महाराष्ट्र आणि जयतु सोशल फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे अधिकाधिक गरजू नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे, हेदेखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
आदर्श सेवा ओपीडी हे आरोग्यसेवा केंद्र ऑफिस नं. ए-१०३, कल्पतरू प्लाझा, रामोशी गेट, भवानी पेठ येथे सुरू करण्यात आले आहे. गरजू नागरिकांनी या केंद्रातील आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

