पुणे-पुणेकरांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. परंतु, खडकवासला धरणामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दूषित सांडपाणी मिसळत असल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापौर व आयुक्त यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना ‘वॉटर प्युरिफायर’भेट देऊन उपरोधिक निषेध व्यक्त केला
पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेबाबत निर्माण झालेली ही परिस्थिती नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकेदायक आहे. केवळ आश्वासनांवर बोळवण न करता प्रशासनाने यावर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केली आहे .
दूषित पाण्याचा स्रोत बंद करा: खडकवासला धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो त्वरित बंद करण्यात यावा.
पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी: शहरातील पिण्याच्या पाण्याची नियमित शास्त्रोक्त तपासणी करून नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पाण्याची खात्री द्यावी.
प्रतिबंधात्मक उपाययोजना: दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक पावले उचलावीत.
दोषींवर कठोर कारवाई: या गंभीर निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या दोषींवर नियमानुसार कडक कारवाई करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या .
“पुणेकरांना आता केवळ आश्वासनं नकोत, तर शुद्ध आणि स्वच्छ पाणी हवं आहे! नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कृती करायला हवी. शुद्ध पाणी हा प्रत्येक पुणेकराचा हक्क आहे आणि त्यासाठी सभागृहात व रस्त्यावर आवाज उठवणे हे आमचे कर्तव्य आहे.”
श्री. अमोल बालवडकर (सभासद, पुणे मनपा व सदस्य, स्थायी समिती)

