पुण्यात सर्वाधिक 56,605 अर्ज; अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला
मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत तब्बल 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदारांचा समावेश झालेला नाही. एकूण 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदारांपैकी 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आला आहे. म्हणजे सुमारे 21.14 टक्के मतदार ASDDO — अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार किंवा इतर कारणांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहेत. हे अंतिम वगळणे नसून दावे-हरकतींची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार नोंदणी, नावावरील आक्षेप आणि दुरुस्त्यांसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांतून 31 ऑगस्ट ते 4 ऑक्टोबरदरम्यान 6 लाख 24 हजार 54 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 6,05,097 फॉर्म 6, 11,251 फॉर्म 7 आणि 7,706 फॉर्म 8 अर्जांचा समावेश आहे.
पुण्यात सर्वाधिक अर्ज
राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 56,605 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानंतर ठाणे 46,373, मुंबई उपनगर 38,094, नाशिक 32,691 आणि जळगाव 28,397 अर्जांसह पुढे आहेत. नागपूरमध्ये 16,009, मुंबई शहरात 13,858 तर पालघरमध्ये 14,448 अर्ज आले आहेत. सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी 2,394 अर्ज प्राप्त झाले.
2.06 कोटी नावे ‘कायमची कट’ झालेली नाहीत
या आकड्याबाबत निवडणूक प्रशासनाने महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. प्रारूप यादीत नसलेली 2.06 कोटी नावे म्हणजे सर्व नावे अंतिमतः रद्द झाली, असा अर्थ नाही. अनेक मतदारांचे Enumeration Form गोळा न होणे, पत्ता बदलणे, मृत्यू, दुबार नोंद किंवा इतर कारणांमुळे त्यांचा समावेश प्रारूप यादीत झालेला नाही. पात्र मतदारांना दावे सादर करून नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी आहे.
12 ऑक्टोबरपर्यंत दावे-हरकती
दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्राप्त दावे व नोटिसांवर 12 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार असून 16 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे WhatsAppवर स्वीकारण्यास आणि गरजेनुसार मतदारांच्या घरी भेट देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
फॉर्म 6, 7 आणि 8 कशासाठी?
फॉर्म 6 नव्याने मतदार नोंदणी किंवा पात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी वापरला जातो. फॉर्म 7 यादितील एखाद्या नावावर आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्याच्या विनंतीसाठी, तर फॉर्म 8 नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर तपशीलातील दुरुस्तीसाठी वापरला जातो.

