महायुती अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी : रवींद्र चव्हाण
पुणे, ता. ५ : पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी सोमवारी विधान भवन येथे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, महेश लांडगे, अमित गोरखे, भीमराव तापकीर, माजी आमदार शरद लाड, संग्राम जगताप, बाबा मिसाळ, जनसुराज्य शक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष समित कदम, शेखर इनामदार, सदाशिव खाडे, प्रशम कोल्हे आणि विजयसिंह माने उपस्थित होते.
‘‘भाजपमध्ये बंडखोरी होत नाही. शरद लाड यांचा उमेदवारी अर्ज ‘डमी अर्ज’ म्हणून दाखल करण्यात आला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी राहतील,’’ असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
चव्हाण म्हणाले, ‘‘डॉ. जाधव यांना प्र-कुलगुरू म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. शैक्षणिक संस्थांच्या अडचणी आणि सरकारशी समन्वय साधण्याची प्रक्रिया त्यांना ठाऊक आहे. पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल. गावडे हे अनेक वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत असून, शिक्षण संस्था आणि शिक्षकांच्या प्रश्नांसाठी काम करीत आहेत. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी महायुतीचे सर्व घटक एकत्रितपणे काम करतील.’’
नाराजांची समजूत काढणार
‘‘अनेक इच्छुकांची समजूत काढली असून, ते महायुतीचे काम करणार आहेत. काही ठिकाणी आम्हीच ‘डमी अर्ज’ दाखल करण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीचे नेते नाराजांची समजूत काढतील. मतदार नोंदणीसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. पुण्यासह नागपूर आणि अमरावतीतील जागांवरही महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी एकत्रितपणे काम करतील,’’ असे चव्हाण यांनी सांगितले.
‘‘माझा गेल्या वीस वर्षांतील शिक्षण क्षेत्राचा अनुभव पदवीधर, तरुण आणि नवउद्योजकांसाठी उपयुक्त ठरेल. रोजगार, स्टार्टअप, इन्क्युबेशन सेंटर आणि कौशल्य विकासावर भर देणार आहे. पदवीधर मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाचही जिल्ह्यांच्या गरजांनुसार नियोजन करणार आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे.’’
— डॉ. स्मिता योगेश जाधव, महायुतीच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार
‘‘मी स्वतः शिक्षक असल्याने शिक्षकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष जाण आहे. जुनी पेन्शन, टीईटी सक्ती, अशैक्षणिक कामांचा बोजा आणि संचमान्यतेच्या निकषांमुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देणार आहे. हे प्रश्न विधानभवनात मांडून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. मतदारसंघातील सर्व घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहे.’’
— कौस्तुभ गावडे, महायुतीचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार

