घोरपडे पेठेत छापा; बलराम प्रताप परदेशी ताब्यात
पुणे : महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी मद्यविक्री पूर्णपणे बंद असताना घोरपडे पेठ परिसरात अवैधरीत्या देशी-विदेशी मद्यविक्री करणाऱ्या इसमावर खडक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांसह ४१ हजार ९१० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे आणि अमित जमदाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ४१ घोरपडे पेठ, पुणे येथे एक इसम देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांची विक्री करत आहे. ही माहिती वरिष्ठांना कळवून पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईत बलराम प्रताप परदेशी (वय ४४, रा. ४१ घोरपडे पेठ, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मद्याची एकूण किंमत ४१,९१० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे तसेच पथकातील अंमलदारांनी केली.

