काशेवाडीतील घटनेने खळबळ; सराईत गुन्हेगाराच्या खुनाचा अवघ्या तीन तासांत उलगडा; मित्रालाच खुनाच्या आरोपात अटक
पुणे : भवानी पेठेतील काशेवाडी परिसरात सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ झुरळ्या पाटोळे याचा डोक्यात आणि तोंडावर मारहाण करून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणाचा खडक पोलिसांनी अवघ्या तीन तासांत छडा लावत मृताच्या मित्राला अटक केली. अजय उर्फ ‘चोर राजा’ सुखदेव शिंदे (वय 31, रा. महादेव मंदिराजवळ, काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. …
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर रोजी वजन काटा परिसरातील श्री मुरतजी को-ऑप. सोसायटी, 363 काशेवाडी, भवानी पेठ येथे अक्षय उर्फ झुरळ्या पाटोळे याचा खून झाल्याचे समोर आले. सुरुवातीला आरोपीची ओळख पटलेली नव्हती. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त आणि खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास पथकाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने परिसरात आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मृत अक्षय आणि त्याचा मित्र ‘चोर राजा’ शिंदे यांच्यासह आणखी दोन मित्र खुनाची बातमी पसरायच्या आधीपर्यंत काशेवाडी परिसरात एकत्र फिरत होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मित्रांची नावे निष्पन्न करून शोध सुरू केला.
‘चोर राजा’ काशेवाडी परिसरातून गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरासह आई-वडील, भाऊ, नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडे तपास केला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे स्वतः खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने आपल्या मित्राचा खून केल्याचे सांगितल्यानंतर त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव करीत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार तसेच तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली.

