पुणे : मी शेती करत असल्याने माझी सगळी स्वप्ने पिकांशी जोडलेली आहेत. एकत्र कुटुंब असल्याने नात्यातील गुंतागुंत अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे ‘संसाराच्या रगाड्यात डोळ्यात कवितेच्या ओळींचे काजळ घालावे’ अशा ओळी सुचतात.
रानातील रखरखीतपणा बघताना मनात आपसुक ओलावलेले शब्द किंवा भावना म्हणजे कविता, असे भावोद्गार कवयित्री कल्पना दुधाळ यांनी काढले.
करम प्रतिष्ठानतर्फे प्रतिष्ठेच्या ‘करम – काव्यतेज’ पुरस्काराने कवयित्री कल्पना दुधाळ (दौंड) यांचा रविवारी (दि. २७) गौरव करण्यात आला. त्या वेळी त्या पुरस्काराला उत्तर देताना बोलत होत्या. पुरस्कार वितरण करम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर आणि संचालिका प्रज्ञा महाजन यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कल्पना दुधाळ पुढे म्हणाल्या, सुचण्याच्या पातळीवर काहीतरी संवेदना असतात. कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न-खटाटोप असतो. हा खटाटोप मनातले बोलणे समृद्ध करणारा असतो.
भूषण कटककर यांनी प्रास्ताविकात करम प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती देत कल्पना दुधाळ यांच्या लेखनाविषयी विश्लेषण केले. ते म्हणाले, दुधाळ यांची कविता निसर्ग, ऋतू, माती, पीक, बियाणे, मेहनत, व्यथा, निसर्गछटा यांना अभिव्यक्त करत आली आहे. प्रतिमा व प्रतीकांचे उत्कृष्ट उपयोजन हे त्यांच्या कवितेचे एक मोठे गुणवैशिष्ट्य आहे.
प्राजक्ता वेदपाठक यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले यांनी परिचय पत्राचे तर वैजयंती आपटे यांनी मानपत्राचे वाचन केले.
या निमित्ताने ‘व्यथा बळीराजाची’ या विषयावर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. चिन्मयी चिटणीस, उमा व्यास यांनी सूत्रे सांभाळली.

