शहरभर ३८ घाट, ८१२ लोखंडी टाक्या, २२४ मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था; ४,१७९ सफाई सेवकांसह मोठी महापालिका यंत्रणा कार्यरत
पुणे : गणेशोत्सव २०२६ दरम्यान पुणे शहरात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या विविध सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण ६ लाख ७७ हजार ५७ गणेशमूर्तींचे विसर्जन व संकलन करण्यात आले. याच कालावधीत ७ लाख १५ हजार ५९ किलो निर्माल्य संकलित करण्यात आल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
महापालिकेने नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांना नदी किंवा तलावात मूर्ती विसर्जन न करता महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि मूर्ती संकलन केंद्रांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३८ घाटांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच ३८ ठिकाणी ५८ बांधीव हौद, ३०५ ठिकाणी ८१२ लोखंडी टाक्या आणि २२४ मूर्ती संकलन केंद्रे उपलब्ध करून देण्यात आली होती.
शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणि शाडू माती संकलनासाठी शहरात ४५ ठिकाणी स्वतंत्र संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी २६७ ठिकाणी ३५८ निर्माल्य कलश व कंटेनर ठेवण्यात आले होते.
बांधीव हौदांत १.०९ लाख, लोखंडी टाक्यांत ३.९४ लाख मूर्ती
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान १,०९,४७९ गणेशमूर्तींचे बांधीव हौदांत विसर्जन करण्यात आले. ३,९४,३४९ गणेशमूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन झाले, तर १,७३,२२९ गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर स्वीकारण्यात आल्या. अशा प्रकारे शहरभर एकूण ६,७७,०५७ गणेशमूर्तींचे विसर्जन व संकलन झाले.
बांधीव हौद आणि लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या मूर्तींच्या पुनर्विसर्जनासाठी वाघोली येथील खाणीची व्यवस्था करण्यात आली होती. १५ क्षेत्रीय कार्यालयांतून येणाऱ्या मूर्तींचे तेथे सन्मानपूर्वक पुनर्विसर्जन करण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले.
४,१७९ सफाई सेवक; १,६७० वाहने
गणेशोत्सवाच्या संपूर्ण नियोजनासाठी महापालिकेने मोठे मनुष्यबळ रस्त्यावर उतरवले होते. शहरभर १६ वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, १६१ आरोग्य निरीक्षक, २९२ मुकादम आणि ४,१७९ कायम सफाई सेवक उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या मागणीनुसार १,६७० वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.
गणेशोत्सव काळात शहरातील सार्वजनिक सशुल्क स्वच्छतागृहे नागरिक आणि पर्यटकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती. संबंधित केअरटेकरना वापरकर्त्यांकडून शुल्क न आकारण्याचे आदेश देण्यात आले होते.
९ लाख १८ हजार किलोहून अधिक कचरा संकलित
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत ९,१८,५३७ किलो कचरा संकलित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामध्ये ५,४६,३५४ किलो ओला कचरा, ३,७२,१८४ किलो सुका कचरा, १८,९१० किलो डेकोरेशन साहित्य आणि २,१५३ किलो चपला-बूट यांचे वर्गीकरण करण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, ओपन प्लॉट, नदी घाट, विसर्जन हौद परिसर आणि गणेश मंडळांच्या परिसरातील स्वच्छतेचे काम दैनंदिन पद्धतीने सुरू ठेवण्यात आले. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांसाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र सफाई सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. मिरवणूक मार्ग आणि कृत्रिम हौदांची स्वच्छताही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत सुरू ठेवण्यात आली.
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयात अनंत चतुर्दशीला १४,४७७ मूर्तींचे विसर्जन
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी १४,४७७ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन व संकलन करण्यात आले. या भागात एकूण १८ ठिकाणी विसर्जन आणि मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या १४,४७७ मूर्तींपैकी ९,९८५ मूर्तींचे बांधीव हौदांमध्ये विसर्जन, ३,९२८ मूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये विसर्जन, तर ५६४ मूर्ती संकलन केंद्रांवर स्वीकारण्यात आल्या.
ही संपूर्ण व्यवस्था उप आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन संतोष वारुळे, उप आयुक्त परिमंडळ क्रमांक ५ माधव जगताप आणि महापालिका सहाय्यक आयुक्त, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय तिम्मया जगले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
यामध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक चंद्रवदन गायकवाड, नितीन साळुंके, शिवाजी गायकवाड, कृष्णा अवघडे, प्रमोद गायकवाड, संजय तेरेकर, विशाल पाटसकर, अमोल लांडगे, तौसीफ देशपांडे आणि संतोष गिते, तसेच सर्व अभियंता वर्ग, मुकादम आणि सेवक यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
महापालिकेने सांगितले की, गणेशमूर्ती विसर्जनाच्या संपूर्ण काळात नागरिकांनी शिस्त पाळत पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद दिला. विसर्जन घाट आणि संकलन केंद्रांवर कार्यरत महापालिका कर्मचाऱ्यांनाही नागरिकांनी सहकार्य केले. कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने नागरिक आणि गणेशभक्तांचे आभार मानले आहेत.

