१३४ व्या वर्षाची सांगता मिरवणूक थाटामाटात; प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित रथ, चेंदा मेलमसह विविध पथकांचा सहभाग
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या १३४ व्या वर्षाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला, शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी थाटामाटात निघणार आहे. यंदा दगडूशेठ गणपती बाप्पा ‘श्री वक्रतुंड’ रथामध्ये विराजमान होणार असून, हा रथ आकर्षक रोषणाईने सजविण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली आहे.
सलग चौथ्या वर्षी दगडूशेठ गणपती दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
यंदाच्या उत्सवात साकारण्यात आलेल्या वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीच्या धर्तीवर सांगता मिरवणुकीच्या रथाची मांडणी करण्यात आली आहे. भारतीय मंदिर वास्तुकलेवर आधारित या रथात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा संगम दिसणार आहे.
रथावर एकूण ८ नक्षीदार खांब असून, त्यातील चार खांबांवर भगवान विष्णू आणि भगवान कुबेर यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. रथाच्या वरच्या भागात शिखर, घुमट आणि जाळीदार नक्षीकाम करण्यात आले आहे. रथाचा आकार १५ बाय १५ फूट, तर उंची २१ फूट आहे.
रथावर आकर्षक झुंबरे, एलईडी तसेच पार लाईटचे फोकस लावण्यात येणार असून, त्यामुळे रात्रीच्या मिरवणुकीत रथाचे सौंदर्य अधिक खुलून दिसणार आहे.
‘अमली पदार्थ मुक्त भारत’चा संदेश
सांगता मिरवणुकीत सर्वात पुढे ‘जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान’ याबाबत जनजागृती करणारा मानवसेवा रथ असेल. त्यासोबत विनायक आणि रोहन देवळकर यांचा चौघडा तसेच प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन होणार आहे.
यानंतर स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक सहभागी होणार आहे. मिरवणुकीत पुरुष भाविकांसोबत महिला गणेशभक्तही मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.

