मुंबई : मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही ‘स्पेशल २६’ हा सिनेमा पाहिलाच असेल. अगदी तसाच प्रकार इथे घडला आहे. या सिनेमात खोटे अधिकारी बनून लूट करण्यात आली होती. अशाच पद्धतीने झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून करोडोंची लूट केली. खरंतर, राज्यात ईडी म्हटलं की लोकांना घाम फुटतो. याचाच फायदा घेत भामट्यांनी खोटे ईडी अधिकारी बनून छापा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.या सोन्याची एकूण किंमत एक कोटी ७० लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.