डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार दुरदृश्य प्रणालीद्वारे महिलांच्या जागतिक आंदोलनाच्या मुद्द्यांची देवाणघेवाण
पुणे : स्त्री आधार केंद्राच्या वतीने येत्या मंगळवारी ७ मार्च ०२३ रोजी येत्या “महिलांची छेडछाड रोखण्यात प्रशासन, पोलीस आणि माध्यमांचे योगदान” विषयावर दुरदृश्य प्रणालीद्वारे चर्चासत्र होणार आहे.
जागतिक महिला आयोगाच्या ६७ व्या सत्राचे आयोजन या वर्षी न्यूयॉर्कमध्ये सोमवार दिनांक ६ ते १३ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या सत्रामध्ये स्त्री आधार केंद्राने आपला सहभाग नोंदविला आहे.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक महिला आयोगाच्या ६७ व्या सत्राच्या निमित्ताने शनिवार दिनांक ११ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता “ग्रामीण भागात महिलांनी केलेल्या अत्याचार विरोधी लढ्यात मिळविलेले यश” विषयावर मुख्य सत्राचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली हे दोन्ही कार्यक्रम संपन्न होत आहेत.
या अनुषंगाने येत्या मंगळवारी ७ तारखेला महाराष्ट्रातील प्रसिध्द माध्यमकर्मी राही भिडे, संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, नागपूरच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी प्रियांका नारनवरे, गेली तीन दशके लातूर जिल्ह्यातील भूकंपाच्या आपत्तीतून महिलांसाठी काम करणारे स्त्री आधार केंद्राचे लातूर जिल्ह्यातील कार्यकर्ते गौतम गालफाडे, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडी येथील महिला कार्यकर्त्या, संभाजीनगर येथील पत्रकार पृथा वीर आदी आपले मनोगत मांडणार आहेत. या प्रसंगी अध्यक्षीय भाषण विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या परिसंवादाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर एकमताने ठरविण्यात आलेल्या महिला विषयक कार्याच्या उद्दिष्ठांचे विवरण करणार आहेत.
या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांच्या अत्याचार, छेडछाड आणि त्या विरोधात सुरु असलेले सर्व स्तरातील प्रयत्न याबाबत चर्चा होणार आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झूमद्वारे सहभाग घेता येणार आहे.