कंत्राटदार खलील शेख आत्महत्या प्रकरण; पत्नीच्या फिर्यादीवरून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : गुलटेकडीतील डायस प्लॉट परिसरात राहणारे कंत्राटदार खलील राजुलाल शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जणांविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांच्या पत्नी सुलताना खलील शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १६ जुलै २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या डीसीआर नोंदीनुसार, या प्रकरणात विशाल केदारी, सुनील अय्यर आणि त्यांचा मुलगा, रघु गौडा, सुनील बोरा, राजन सेटिया, हमीद भाई शेख आणि त्यांचा मुलगा, बाळासाहेब शेडगे आणि त्यांची पत्नी, रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी, शाम कोळपकर तसेच शुभम नावाच्या व्यक्तीचा आरोपी म्हणून उल्लेख आहे.
आर्थिक व्यवहारातून मानसिक आणि आर्थिक त्रास दिल्याचा आरोप
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, सन २०१५ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत खलील शेख यांचे संबंधित आरोपींसोबत सेंटरिंग व्यवसायाच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहार होते. या व्यवहारांमधून शेख यांना धमकी, शिवीगाळ तसेच मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.
या प्रकारामुळे खलील शेख तणावात होते, असेही फिर्यादीत म्हटले आहे. बाळासाहेब शेडगे यांनी शेख यांच्या सेंटरिंग व्यवसायातील साहित्य जबरदस्तीने ताब्यात घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हे सर्व आरोप फिर्यादीच्या आधारे नोंदवण्यात आले असून, त्यांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.
मृत्यूपूर्वी चिठ्ठी आणि व्हिडिओ
खलील शेख यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिली आणि व्हिडिओ तयार करून संबंधित व्यक्तींमुळे त्रास होत असल्याचा आरोप केल्याचे डीसीआर नोंदीत नमूद आहे. या चिठ्ठीतील मजकूर, व्हिडिओ, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे आणि संबंधित व्यक्तींची भूमिका पोलिसांकडून तपासली जाणार आहे.
भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा
या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३१६(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची नोंद आहे. डीसीआर तयार होईपर्यंत कोणालाही अटक झाल्याची नोंद नव्हती. पोलिस निरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


