आठ लाखांची मागणी; तडजोडीनंतर तीन लाख स्वीकारताना एसीबीचा सापळा
पुणे : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दिघी पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस उपनिरीक्षक चेताली गणपत गापट (वय ३५) यांना तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दिघी पोलिस ठाण्यातच ही कारवाई करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक चेताली गापट यांच्याकडे होता. या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तसेच भविष्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला आठ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर तडजोडीअंती तीन लाख रुपये स्वीकारण्यास गापट यांनी सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने दिघी पोलिस ठाण्यात सापळा रचला.
तक्रारदाराकडून तीन लाख रुपये स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक चेताली गापट यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुहास हटेकर, पोलिस निरीक्षक मिथुन म्हात्रे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचेची रक्कम आठ लाखांवरून तीन लाखांवर
तक्रारदाराकडे सुरुवातीला तब्बल आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एसीबीच्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती ही रक्कम तीन लाखांवर निश्चित करण्यात आली. त्यानंतर तीन लाख रुपये स्वीकारताना महिला पोलिस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली.

