पुणे : पुण्यातील विमानतळ पोलिसांनी कारची काच फोडून चोरी करणाऱ्या परराज्यातील सराईत टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी साधने, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, या टोळीने खराडी, येरवडा, लातूर आदी ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
४ जुलै रोजी पुणे नगर रोड परिसरात पार्किंगमध्ये उभी असलेल्या कारची काच फोडून बॅग, महागडा मोबाईल आणि सुमारे ४० हजार रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली होती. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचे फोटो विविध माध्यमांतून प्रसारित केले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी खराडी बायपास परिसरातून तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी हे तामिळनाडू राज्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून कारची काच फोडण्यासाठी वापरण्यात येणारी साधने, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने पुण्यासह इतर भागांतही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची माहिती तपासात समोर आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल घागरे करीत आहेत

