मुंबई दि. ७ (प्रतिनिधी)
मागील दोन दिवसांपासून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रामध्ये झालेली पर्जन्यवृष्टी, धरणातील पाणीसाठा, पूरस्थिती आणि आषाढी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जलव्यवस्थापनाचे सुयोग्य नियोजन करावे, संभाव्य परिस्थितीचा आढावा विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी सतर्कतेने घ्यावा. धरणांमधून पाण्याच्या विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाशी योग्य तो समन्वय ठेवावा. प्रत्येक धरणाचा आपातकालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
मंत्री विखे पाटील यांनी आज दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीचा, तसेच धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा विभागातील अधिकाऱ्यांकडून घेतला. या बैठकीस पुणे आणि नाशिक विभागातील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, दोन्ही महामंडळाचे कार्यकारी संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील अतिवृष्टीची सद्यस्थिती, पूरस्थिती, धरणांमधील जलसाठा व प्रमुख नदीखोऱ्यांतील पाण्याची आवक, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीनुसार धरण संचलन आणि आषाढी पालखी सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या पाण्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कृष्णा व गोदावरी खोऱ्यांत झाल्यामुळे या दोन्ही विभागांत मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. दोन्ही विभागांतील धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली असल्याचे दोन्ही महामंडळांच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले. पुणे विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केवळ १२ टक्के होता, तो ७ जुलैपर्यंत ३१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या ५ दिवसांत सुमारे ८०.८ टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. खडकवासला धरण समूहात ७.५४ टीएमसी, पवना धरणात ४.८४ टीएमसी, भामा आसखेड धरणात ४.१५ टीएमसी, वीर धरण समूहातील भाटघर धरणात ५.१६ टीएमसी, वीर धरणात २.०१ टीएमसी, नीरा देवघर धरणामध्ये २.६२ टीएमसी अशा पद्धतीने धरणांमध्ये पाण्याची आवक झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
नाशिक विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा २६ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यामध्ये भंडारदरा ४.७५ टीएमसी, निळवंडे १.७१ टीएमसी, दारणा १.५५ टीएमसी आणि गंगापूर २.१२ टीएमसी अशा पद्धतीने पाण्याची आवक झाली असून, छत्रपती संभाजीनगर विभागातील मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ३० टक्क्यांवरून ३१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जायकवाडी धरणातील उपयुक्त जलसाठा सुमारे २१.७६ टीएमसीपर्यंत पोहोचला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी धरणांचे सुरक्षित, वैज्ञानिक व समन्वयपूर्ण संचलन करावे. भारतीय हवामान विभाग, केंद्रीय जल आयोग व हवामान पूर्वानुमान प्रणालीकडून प्राप्त होणाऱ्या अंदाजांचा सातत्याने आढावा घ्यावा. धरणांमध्ये होणारी पाण्याची आवक, जलसाठा, विसर्ग आणि नदीपात्रातील प्रवाह या संभाव्य परिस्थितीचे सातत्याने विश्लेषण करून त्यानुसार वेळेवर निर्णय घ्यावा. धरणांमधून विसर्ग करताना जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच राज्य व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क ठेवण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत प्रामुख्याने आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पालखी मार्गावरील नदीपात्र, कालवे व मुक्काम स्थळांवर आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध राहील याचे नियोजन करावे. वारकरी व स्थानिक नागरिकांशी संपर्क ठेवून पालखी सोहळा सुरक्षित व सुरळीत संपन्न होण्याच्या दृष्टीनेही अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
मान्सून कालावधीत धरणाची संरचनात्मक सुरक्षितता, यांत्रिक उपकरणे, विद्युत प्रणालीची नियमित तपासणी करावी व धरणावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कता राखून परिस्थितीतील प्रत्येक बदलावर बारकाईने लक्ष ठेवावे. नदीकाठच्या लोकांना अचूक, पारदर्शक व अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करण्याचे त्यांनी सूचित केले.

