७ हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंकची दुर्दशा भ्रष्टाचारामुळे, देवेंद्र फडणवीस ‘इन्फ्रा मॅन’ नाही तर ‘डिझास्टर मॅन’.. मुंबईतील १२ लोकांचा मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे– हर्षवर्धन सपकाळ.
मुंबई, दि. ६ जुलै २०२६.
राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा धुमाकुळ सुरु असून जिवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाळ्यात खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना भाजपा महायुती सरकार व प्रशासनाची काहीच तयारी दिसत नाही. मुंबई परिसरात मागील दोन तीन दिवसातील घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे, हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर फडणवीसांच्या सुलतानी आपत्तीमुळे झाले आहेत. या १२ मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, मिसिंग लिंक प्रकल्पावर ७१८१ कोटी रुपये खर्च केले पण अवघ्या दोन महिन्याच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत १३ गंभीर आक्षेप पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तज्ञांनी नोंदवले होते, त्यात लोणावळा धरणाजवळील संरेखन, बोगद्यांची सुरक्षितता, भूगर्भीय स्थिरता आणि इतर तांत्रिक मुद्द्यांचा समावेश होता. या आक्षेपांवर काम न करता घाईघाईत काम उरकून, उद्घाटनांचे इव्हेंट करून श्रेयवाद आणि भ्रष्टाचार करून केलेल्या कामाची परिणती पिलर कोसळून वाहतूक बंद ठेवण्यात झाली. टक्केवारीचा मलिदा खाण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या उपस्थित केलेल्या गंभीर मुद्यांकडे दुर्लक्ष करून जनतेचा पैसा आणि जीव धोक्यात घालण्याची फडणवीस सरकारची वृत्ती दररोज समोर येत आहे.
मिसिंग लिंक टेस्टिंग परियड..
मिसिंग लिंकवर खड्डे पडल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो टेस्टिंग पिरियड आहे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्र्याचे हे विधान निर्लज्जपणाचे आहे. २०१४ पासून भाजपाचे सरकार आहे तेव्हापासून टेस्टिंगच सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित करून राम मंदिरातील चोरी लपवली जात आहे तसेच भ्रष्टाचार लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मिसिंग लिंकचा फियास्को भ्रष्टारामुळे झाला आहे. जेवढे जास्त इंजिन लावतील तेवढा भ्रष्टाचार वाढणार आहे. स्वतःच्या फायद्यासाठी भाजपा महायुती सरकारने मुंबईचीही वाट लावली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
पंतप्रधांच्या विदेश दौऱ्यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरेंडर झालेले आहेत, त्यामुळे तोंड लपवण्यासाठी ते विदेश वाऱ्या करत असतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीतरी भारतातही थांबावे, अशी कोपरखळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावली..

