मुंबई.दि.३: वर्धा जिल्ह्यातील १०० खाटांचे महिला व नवजात शिशुरुग्णालय तातडीने कार्यान्वित करण्यासंदर्भातील लक्षवेधी क्र. ६ वरील चर्चेदरम्यान शिवसेना नेत्या व विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रसूतीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणाऱ्या महिलांच्या वाहतुकीचा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत शासनाने याबाबत स्वतंत्र धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
विधानपरिषद सदस्य संजय भेंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होताना डॉ. गोऱ्हे यांनी पालघर जिल्ह्यातील कासा येथील एका महिलेचे उदाहरण सभागृहासमोर मांडले. प्रसूतीसाठी त्या महिलेला पालघरहून ठाणे येथे रुगवाहिकेने आणण्यात आले; मात्र प्रसूतीनंतर तिला परतीच्या प्रवासासाठी रुगवाहिका उपलब्ध करून न देता एसटी बसने पालघरला जावे लागल्याची घटना अत्यंत गंभीर असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी ग्वाही देण्यात आली होती. मात्र, अशा स्वरूपाच्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर स्पष्ट धोरण आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात हलवावे लागत असल्यास तिला रुग्णालयात नेण्यासाठी तसेच प्रसूतीनंतर सुरक्षितपणे घरी परत आणण्यासाठीही एम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी डॉ. गोऱ्हे यांनी मागणी केली.
यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. आवश्यक ते कायदेशीर व प्रशासकीय बदल तातडीने करण्यात येतील तसेच प्रसूतीसाठी आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या महिलांना रुगवाहिकेची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.

