पुणे-उरुळी कांचन परीसरातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. ही करवाई शिंदेवणे काळेश्वर गावातील राठोड वस्ती येथे करण्यात आली. या कारवाईत 3 लाख 4 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राठोड वस्ती येथे गावठी हातभट्टी दारुचा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने पाळत ठेवून छापा टाकला. पोलिसांनी विनापरवाना विक्रीसाठी साठवून ठेवलेली 3 लाख 2 हजार 500 रुपयांची 2,750 लिटर गावठी हातभट्टीची दारु, रोख रक्कम जप्त केली. तर याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिजन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.