पुणे : बावधन येथील महापालिकेचे प्राण्यांचे इन्सिनेटर बोपोडी येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) परिसरात स्थलांतरित करण्यासाठी
सुमारे ३९.११ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला मान्यात दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
महापालिकेच्या विद्युत विभागाने या कामासाठी ३९.३१ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. या कामात इन्सिनेटरच्या स्थापनेसाठी आरसीसी फाउंडेशन, चिमणी उभारणी, अर्थिंग, लाइटनिंग अरेस्टरची उभारणी, वॉटर स्क्रबरसाठी संरक्षक शेड, स्ट्रक्चरल स्टीलचे काम, वेल्डिंग, रंगकाम तसेच आवश्यक विद्युत यंत्रणा उभारण्याचा समावेश आहे.
या कामासाठी सुरुवातीला काढलेल्या निविदेला एकही प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे महापालिकेच्या नियमांनुसार फेरनिविदा मागविण्यात आली. फेरनिविदेत दोन पात्र निविदा प्राप्त झाल्या. निविदा समितीने कागदपत्रांची छाननी आणि तांत्रिक पडताळणीनंतर विचारे अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा मंजुरीसाठी शिफारस केली.
सदर कंपनीने अंदाजित किमतीपेक्षा ०.५० टक्के कमी दराने ३३ लाख १४ हजार ८०१ रुपयांची निविदा सादर केली आहे. जीएसटीसह या कामाची एकूण किंमत ३९ लाख ११ हजार ४६५ रुपये इतकी होणार आहे.
स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराशी करार करून कार्यादेश दिला जाणार आहे. त्यानंतर बावधन येथील प्राण्यांचे इन्सिनेटर बोपोडी एसटीपी परिसरात स्थलांतरित करण्याचे काम सुरू होईल. या स्थलांतरामुळे इन्सिनेटरची सुविधा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने कार्यान्वित करण्यास मदत होईल, असे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

