मुंबई- प्रदेशाध्यक्ष पदाच्या गेल्या वर्षभराच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र करण्याचे लक्ष्य साध्य करण्याचा निर्धार करून राज्यातील भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी झपाट्याने काम केल्याने महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचे नमूद करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीचा आढावा घेतला. भाजपा प्रदेश कार्यालयात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, माध्यम प्रमुख गोविंद येतयेकर आणि कार्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे उपस्थित होते.
11 जानेवारी 2025 रोजी श्री. चव्हाण यांच्याकडे कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1 जुलै 2025 रोजी त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने भाजपाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व मंडल अध्यक्ष, विविध आघाड्यांवरील सर्व कार्यकर्ते आणि खांद्याला खांदा लावून सोबत काम करणारे सर्व कर्मचारी-सहकारी या सर्वांचे आभार मानत श्री. चव्हाण म्हणाले, या कालावधीत संघटनात्मक कामावर भर देत पक्ष मजबूत करण्यासाठी केंद्राने दिलेले उपक्रम तसेच राज्याने पक्षहिताच्या दृष्टिकोनातून राबवलेले उपक्रम आम्ही जनतेपर्यंत पोहोचवले. भाजपा कार्यकर्ते तसेच महाराष्ट्रातील वैचारिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या संस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे सहजपणे शक्य झाले. शेतकरी, कष्टकरी आणि कामगार अशा समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय कसा मिळेल, त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना कशा पोहोचतील याकडे सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, हे लक्षात घेत पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
मी आणि माझ्यासोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांनी पक्षाच्या प्रथा आणि परंपरा पुढे नेण्याचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात भाजपा आणि एनडीएला यश मिळत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय उत्तम यश मिळाले. 29 पैकी 24 महापालिकांमध्ये भाजपा महायुतीची सत्ता आली. सर्वाधिक 1 हजार 425 नगरसेवक निवडून आणत प्रदेश भाजपाने नवा विक्रम केला. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रतिनिधी भाजपाचे आहेत. महाराष्ट्रातील तमाम जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे हे शक्य झाल्याने त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असल्याचे त्यांनी सांगितले.
22 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यव्यापी महारक्तदान संकल्प शिबिराचे आयोजन करून एकाच दिवशी तब्बल 1हजार 88 शिबिरांमध्ये 78 हजार 313 युनिट इतके विक्रमी रक्त संकलन करण्यात आले. या कामगिरीची नोंद एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये घेण्यात आल्याची माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
येत्या काळात महाराष्ट्रात अधिक चांगल्या पद्धतीने आणि संघटनात्मकदृष्ट्या पुढे जायचे असेल तर कार्यकर्ता म्हणून जबाबदारीने पक्ष संघटना आणि बूथवरच्या आपल्या रचना पूर्ण करण्यावर कार्यकर्ते भर देतील. येत्या काळात यापेक्षाही अधिक उत्तम पद्धतीने काम केले जाईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निर्धारामुळे भाजपाची यशाकडे घोडदौड-अध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी साधला संवाद
Date:

