▪️ ‘सहकार से समृद्धी’ संकल्पनेच्या धर्तीवर राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन-सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे
पुणे, दि. २५: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर भारत सरकारच्या सूचनेनुसार देशभरात २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत ‘सहकार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रात हा सप्ताह अत्यंत व्यापक स्तरावर आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सहकार आयुक्तालय व राज्यातील प्रमुख सहकारी महासंघांनी जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकारी बँका, पतसंस्था, गृहनिर्माण संस्था, कृषी संस्था, प्रक्रिया संस्था, ग्राहक संस्था, महिला व युवक सहकारी संस्था तसेच सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील सहकारी संघटनांनी या सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था दिपक तावरे यांनी केले आहे.
सहकार चळवळीबाबत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करणे. युवक, महिला आणि विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्राशी जोडणे. सहकारी संस्थांच्या यशोगाथा समाजासमोर आणणे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे. सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभाग वृद्धिंगत करणे. सहकार क्षेत्रातील नवकल्पना, तंत्रज्ञान व पारदर्शक व्यवस्थापनाचा प्रसार करणे ही सहकार सप्ताह आयोजन करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत राज्यातील सहकारी संस्थांसाठी खालील महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना व उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर, सहकार सप्ताह आणि सहकार मंत्रालयाच्या वर्धापन दिनानिमित्त पुढीलप्रमणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय कार्यशाळा व ध्वजारोहण: सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात येईल, ज्यामध्ये सहकाराची तत्त्वे व मूल्यांवर व्याख्याने होतील. तसेच, सप्ताहाच्या पहिल्या दिवशी (29 जून 2026) सर्व सहकारी संस्थांच्या इमारतींवर सहकार ध्वजाचे ध्वजारोहण केले जाईल आणि सहकाराची शपथ घेतली जाईल.
युवक व महिलांचा सहभाग आणि स्पर्धा: नवीन पिढीला सहकाराची ओळख करून देण्यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व व एकांकिका स्पर्धा घेतल्या जातील. तसेच कार्यक्रमांमध्ये महिला व युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढवला जाईल.
पर्यावरण व सामाजिक बांधिलकी: ‘सहकार से समृद्धी’ अंतर्गत संपूर्ण राज्यात संस्थांमार्फत व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. यासोबतच रक्तदान आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले जाईल.
यशोगाथा व डिजिटल मोहीम: सहकारी संस्थांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्याचे छोटे व्हिडिओ व रील्स तयार करून ते समाज माध्यमांवर प्रसारित केले जातील.
गृहनिर्माण संस्थांसाठी तंटामुक्ती: राज्यातील गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये या सप्ताहात ‘तंटामुक्ती अभियान’ राबवून आपसातील वाद मिटवण्यावर भर दिला जाईल.
विशेषांक: विविध सहकारी संस्थांच्या फेडरेशन मार्फत सहकार सप्ताहाचे निमित्ताने मासिकाचा विशेषांक छापण्यात येऊन त्यास व्यापकरित्या प्रसारीत करण्यात येईल.
नाविन्यपूर्ण उपक्रम: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमार्फत सहकाराच्या इतिहासावर हिंदीत लघुपट व ‘सहकार प्रार्थना’ तयार केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या वह्यांच्या पहिल्या पानावर सहकाराची माहिती छापण्याचाही मानस आहे. तसेच, सप्ताहादरम्यान ‘राज्यस्तरीय युवा सहकारी संस्थेची’ नोंदणी केली जाईल.
केंद्रीय योजनांचा प्रचार व समन्वय: या सप्ताहामध्ये आयोजित सर्व कार्यक्रमांच्या मुख्य व्यासपीठावर केंद्रीय सहकार मंत्रालयाचा लोगो बंधनकारक करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांपर्यंत प्रसार करण्यासाठी विशेष मेळावे घेतले जातील. असेच कार्यक्रम राज्यातील विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावर, ग्रामपातळीवर देखील आयोजित करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राची सहकार चळवळ ही देशात अग्रगण्य असून, या सप्ताहाच्या माध्यमातून तळागाळातील सभासदांपर्यंत सहकाराची भावना अधिक घट्ट करण्याचा विभागाचा मानस आहे, अशी माहिती श्री. तावरे यांनी दिली आहे

