पुणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक सहभाग आणि स्वावलंबनासाठी कार्यरत असलेल्या ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन (एआयएससीए) या संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या एआयएससीए मोबाईल अॅपचे लोकार्पण शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी होणार आहे.
ॲपचा लोकार्पण सोहळा सायंकाळी ४.३० वाजता घोले रोडवरील पंडित जवाहरलाल नेहरू ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे, मूर्तीशास्त्राचे अभ्यास गो. बं. देगलूरकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, उद्योजक अरविंद बुधाणी, आपलं घरचे विजय पळणीकर, डीसीपी कृष्णकांत रावले, जैन सोशल ग्रुपचे युवराज शहा, दिलीप पवार, उद्योजक एम. ए. तेजाणी, दिलीप बोरावके, लोकमान्य हास्ययोगचे डॉ. प्रसाद आंबीकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती असोसिएशनच्या संस्थापक व संचालिका शकीला शेख यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषदेत दिली. डॉ. किशोर सरपोतदार, सुनीला कविटकर, सुहास घोडके, रवींद्र शाळू, अजित कुमठेकर, दिलीप पवार या वेळी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षापासून ऑल आयकॉनिक सिनिअर सिटिझन्स असोसिएशन ही संस्था ज्येष्ठ नागरिकांमधील वाढता एकाकीपणा, सामाजिक अलिप्तता, मानसिक आरोग्याच्या समस्या, डिजिटल अज्ञान आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे. आज ही चळवळ दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कार्यरत असून देशभरातील ज्येष्ठांपर्यंत पोहोचण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहे.
शकीला शेख यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेले हे मोबाईल अॅप ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासार्ह साथीदार ठरणार आहे. या अॅपमध्ये आपत्कालीन मदत, सुरक्षितता सूचना, सामाजिक सहभाग, डिजिटल सहाय्य, आरोग्यविषयक माहिती, संपर्क व्यवस्था आणि एका क्लिकवर मदत मिळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेषतः एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले हे अॅप त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक आत्मविश्वास, सुरक्षितता आणि मानसिक आधार निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शकीला शेख यांनी केले आहे.

