पुणे-लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील वेदना कायम असताना ही घटना घडल्यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला व आरोपी पुरुषाची रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पार्टीत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला घरी सोडतो म्हणून कारमध्ये बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कसारख्या शहरातील वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी या घटनेतील गांभिर्य ओळखून तपास सुरू केला आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपीचा शोध सुरू केला आहे.

