- लोहगाव, येवलेवाडी पोलीस निरीक्षकांशी साधला संपर्क
- ’महिला दक्षता समित्या’ सक्रिय करून समुपदेशन करण्याचे निर्देश
पुणे दि.१७ मे, २०२६: पुण्यातील लोहगाव आणि येवलेवाडी परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार व विनयभंगाच्या घटनांची शिवसेना नेत्या तथा मा.उपसभापती विधानपरिषद आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ दोन्ही पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आणि आरोपींवर कडक कारवाईचे निर्देश दिले.
येवलेवाडी येथील घटनेत ९ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत आजोबानेच अत्याचार केल्याचे समोर आले आहे. यावर तीव्र दुःख व्यक्त करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींकडूनच असे अत्याचार होत असल्याबद्दल अतिशय खंत वाटत आहे. अशा घटना रोखण्यासाठी संबंधित वस्त्यांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर समुपदेशन आणि प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे.”
वस्त्यांमध्ये सुरक्षिततेचे वातावरण तयार करण्यासाठी आणि प्रबोधनासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांमधील ‘महिला दक्षता समित्या’ तातडीने सक्रिय कराव्यात.
पीडित कुटुंब मूळचे नेपाळचे असले, तरी त्यांना शासनाच्या ‘मनोधैर्य योजने’च्या माध्यमातून आर्थिक व मानसिक मदत मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तात्काळ प्रयत्न करावेत.
गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल अशा पद्धतीने तपास करून पीडित चिमुरडीला न्याय द्यावा, असे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

