पुणे-कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत रोड शो काढण्यात आला. या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनता पक्ष विशेष मेहनत घेत असून, घरोघरी प्रचारासह सभा, पदयात्रा, बाईक रॅली अशा विविध मार्गांनी मतदारांशी संपर्क केला जात आहे.आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आले होते. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकासमोरुन रॅलीची सुरुवात झाली. अंगरशाह ताकिया, डांगे चौक, पालखी चौक, हमाल तालीम, नटरंग मंडप, पिंपरी चौक, नानापेठ, नाना चावडी, लक्ष्मीरोड, सोन्या मारुती, फडके हौद, लाल महाल, रतन टॉकीज, आप्पा बळवंत चौक, पत्र्या मारुती आदी मार्गांवरुन हा रोड शो मार्गस्थ झाला. रॅलीचा समारोप कामगार मैदानात झाला.
या रॅलीला तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. असंख्य तरुण रॅलीत आपली दुचाकी घेऊन सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत करण्यात आलं, तर महिलांकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि उमेदवार रासने यांचं औक्षण करण्यात आलं.